कोस्टल रोड २४ तास खुला; विहार पथासह चार प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:37 IST2025-08-15T11:51:45+5:302025-08-15T12:37:07+5:30

कोस्टल रोड शुक्रवारी मध्यरात्री मुंबईकरांसाठी २४ तास खुला होणार आहे

Coastal Road to open 24 hours for Mumbaikars from Friday midnight | कोस्टल रोड २४ तास खुला; विहार पथासह चार प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कोस्टल रोड २४ तास खुला; विहार पथासह चार प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : कोस्टल रोड शुक्रवारी मध्यरात्री मुंबईकरांसाठी २४ तास खुला होणार आहे. मात्र त्यावरून अतिवेगाने वाहन चालविणारे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यामुळे २४ तास खुल्या राहणाऱ्या या मार्गावर मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्यांच्या घरी नोटीसही येईल आणि पोलिसही येतील.

कोस्टल रोडच्या विहार पथाचे आणि ४ प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. त्यावेळी २४ तास खुल्या राहणाऱ्या कोस्टल रोडवर वाहतुकीच्या नियमांचे पालन करून मुंबईकरांनी त्याचा वापर करावा, असा सूचनावजा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. सुंदर असा समुद्रकिनारी रस्ता २४ तास सुरू केल्यावर वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

'जीव धोक्यात घालू नका' 

मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नयेत आणि आपला व इतरांचा जीव धोक्यात घालू नये.

कॅनरी रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिस कार्यवाही करतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सूचित केले.

सौंदर्यात भर 

नागरिकांना समुद्र किनारी फेरफटका मारता यावा, यासाठी पालिकेने विहार क्षेत्र विकसित केला आहे. प्रशस्त पदपथ, हिरवळ, सायकल ट्रॅक तसेच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आदी सुविधांमुळे या रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.

मुंबईत काँक्रिटचे रस्ते तयार केले जात आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जात आहेत. किनारी रस्त्याच्या दुतर्फा ७० हेक्टर क्षेत्रात उद्यान विकसित केले जात आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप यावे यासाठी पालिका प्रयत्नशील आहे- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मुंबई हे देशाचे आर्थिक इंजिन असून, समाजातील प्रत्येक घटक मुंबईच्या विकासासाठी घाम गाळत आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. मुंबईत रस्ते विकास वेगाने सुरू असून, पालिका विकासाभिमुख प्रकल्प राबवत आहे. दरम्यान, प्रकल्पांची कामे अधिक दर्जेदार व्हावीत, यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे- अजित पवार, उपमुख्यमंत्री
 

Web Title: Coastal Road to open 24 hours for Mumbaikars from Friday midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.