चारकोप सेक्टर ८ मधील कोस्टल रोड पिलिंगमुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण, आमदार संजय उपाध्याय यांची पालिका आयुक्तांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:26 IST2026-02-18T19:24:51+5:302026-02-18T19:26:05+5:30
काम सुरू करण्यापूर्वी स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

चारकोप सेक्टर ८ मधील कोस्टल रोड पिलिंगमुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण, आमदार संजय उपाध्याय यांची पालिका आयुक्तांकडे धाव
मुंबई : चारकोप, सेक्टर ८ येथे सुरू असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पिलिंग कामामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि,११ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या कामादरम्यान इमारतींमध्ये तीव्र कंपने जाणवत असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, काहींनी या कंपनांची तीव्रता भूकंपासारखी असल्याचे सांगितले आहे. काम सुरू करण्यापूर्वी स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करत काम सुरू करण्यापूर्वी रहिवाशांना विश्वासात घ्यावे, परिसरातील सर्व इमारतींची व्हीजेटीआय/आयआयटीमार्फत तांत्रिक तपासणी करावी, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी स्पष्ट हमी द्यावी व जबाबदारी निश्चित करावी, तसेच नियमांचे काटेकोर पालन करून जबाबदार अधिकाऱ्याची सतत उपस्थिती ठेवावी, अशा मागण्या केल्या. यासोबतच प्रदूषण नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचीही त्यांनी प्रशासनाला सूचना केली.
आम्ही विकासकामांच्या विरोधात नाही; मात्र नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पालिका प्रशासनाने लोकांचा विश्वास जपणे गरजेचे आहे, असे आमदार उपाध्याय यांनी स्पष्ट केले. दरम्यान स्थानिक रहिवाशांनीही पालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली असून या प्रकरणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.