कोस्टल रोड झाला, आता मुंबईकरांना हवे 'कोस्टल फॉरेस्ट'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:20 IST2025-02-11T15:17:34+5:302025-02-11T15:20:18+5:30
वेगवान प्रवासासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड खुला होत असताना वाढत्या प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांचा श्वास मात्र कोंडल्याचे चित्र आहे.

कोस्टल रोड झाला, आता मुंबईकरांना हवे 'कोस्टल फॉरेस्ट'!
वेगवान प्रवासासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड खुला होत असताना वाढत्या प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांचा श्वास मात्र कोंडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडलगत ७० हेक्टर मोकळ्या जागेवर कोस्टल फॉरेस्ट संकल्पनेचा विचार करावा असा प्रस्ताव रहिवाशांनी पालिकेसमोर मांडला आहे. यासाठी कोस्टल रोडलगत राहणाऱ्या रहिवासी संघटनांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
कोस्टल रोडलगतच्या या जागेत पालिकेने पारंपरिक तसेच घनदाट अशा पिंपळ, वड, कडुलिंब वृक्षांची लागवड करुन कोस्टल किंवा अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राबवावी. यामुळे शहरात सातत्याने होणाऱ्या हवा प्रदूषणात घट होईल. शिवाय मोठा हरित पट्टा उपलब्ध होऊन स्वच्छ हवा मिळेल, असे मत रहिवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.
काय आहेत मागण्या?
भविष्यात उभे राहणारे कोस्टल फॉरेस्ट व्यवसायीकरणमुक्त ठेवावे. पालिकेने नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश करावा.
अधिकाअधिक उपयोग होईल अशा पद्धतीने पर्यावरण नियम लागू करावेत. यासाठी शासन व नागरिकांची समिती स्थापन करावी.
प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण तसेच तापमान वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी पर्यावरणीय आराखडा आणि क्लायमेट अॅक्शन प्लॅन तयार करावा.
यशस्वी प्रयोग
बीजिंगच्या ग्रीनबेल्ट प्रोग्रॅममध्ये २ लाखांहून अधिक झाले लावली गेली. ज्यामुळे अनेक भागांमध्ये हवेच्या प्रदूषणात १५-२० टक्क्यांनी घट झाली. न्यूयॉर्कमधील मिलियन ट्रीज प्रकल्पामुळे दरवर्षी १,३०० टन प्रदूषके कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारली. टोकिओच्या ग्रीन बफर झोनमुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यात आल्याने हवेचे प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी झाले.