Join us

‘कोस्टल रोड’ सहा महिन्यांत, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू;  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 02:06 IST

प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद लाभला असून, कोस्टल रोडवरून नोव्हेंबर महिन्यात मुंबईकरांना सुसाट प्रवास करता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी पालिकेकडून प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे - वरळी सी-लिंकदरम्यान कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी बोगद्याचा ब्रेक थ्रू करण्यात आला. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद लाभला असून, कोस्टल रोडवरून नोव्हेंबर महिन्यात मुंबईकरांना सुसाट प्रवास करता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोस्टल रोडचे प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे - वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गादरम्यान दोन बोगदे खणण्यात येत आहेत. भारतातील सर्वांत मोठ्या ‘मावळा’ या टीबीएम यंत्राच्या साहाय्याने बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारी ‘मावळा’ जमीन भेदून दुसऱ्या बाजूने बाहेर आला. दुपारी प्रियदर्शनी पार्क येथे हा क्षण समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. भारतातील सर्वांत मोठ्या व्यासाचा हा बोगदा पूर्ण झाल्याने अभियंते, कामगार आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ढोलताशे वाजवून आनंद साजरा केला. यावेळी आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे व इतर अधिकारी उपस्थित होते.  

भूमिपुत्रांनाही घेतले विश्वासातया प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होईल व जलद प्रवास करता येईल. बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध आधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनाही विश्वासात घेतले. मासेमारीवर परिणाम होऊ नये म्हणून समुद्रातील दोन खांबांमधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटर केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यात आला.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीमावळ्याप्रमाणे डोंगर पोखरून गड केला सरमुंबईच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ‘मावळा’ या यंत्राने हा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण केले असून, मावळ्याप्रमाणे डोंगर पोखरून गड सर केला आहे. बोगदा ब्रेक थ्रू होणे व या क्षणांचे साक्षीदार होणे हे आपले भाग्य आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोस्टल रोडला छत्रपती संभाजीराजे नावकोस्टल रोडला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमुंबई