Coastal protection will now be helped as the Tiwari forest grows | तिवरांचे जंगल वाढल्याने किनारपट्टी रक्षणास होणार आता मदत

तिवरांचे जंगल वाढल्याने किनारपट्टी रक्षणास होणार आता मदत

मुंबई : राज्यातील १६,९९९ हेक्टरवर पसरलेल्या खारफुटीचे जंगल शासनाने आरक्षित वन म्हणून घोषित केले आहे. सर्व जिल्ह्यांत खारफुटीच्या जंगलात ४८.७९ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. तिवरांचे जंगल वाढल्याने किनारपट्टीच्या रक्षणास मदत हाेत आहे.

खारफुटीच्या संवर्धनासाठी वन विभागाने काही कृतिशील पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा एक भाग म्हणून मॅनग्रोव्हज फाउंडेशनने २०१८ मध्ये भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला मॅनग्रोव्हज मॅपिंगसाठी मंजुरी दिली होती. राज्यातील १७ हजार हेक्टरवर पसरलेल्या खारफुटीचे जंगल सरकारी जमिनीवर असून, सुमारे १३ हजार हेक्टरचे जंगल खासगी जमिनीवर पसरलेले आहे.

कृतिशील पावले उचलण्याच्या निर्णया अंतर्गत या प्रकल्पाची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे महाराष्ट्रातील खारफुटीचे प्रमाण आखणे आणि त्याचे परीक्षण करणे. शिवाय ॲप्लिकेशन टूल विकसित करीत खारफुटी वनस्पतीचे आरोग्य प्रत्यक्ष वेळी उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार मूल्यांकन करणे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील किनारपट्टी असलेले ७ जिल्हे म्हणजेच, मुंबई व मुंबईचे उपशहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पाली येथे होणार आहे. किनारपट्टीचे समुद्राच्या लाटा, वादळे, वारा यांपासून संरक्षण करण्याचे काम खारफुटीचे असते. भारताच्या किनारपट्टीची लांबी ७,५१७ किलोमीटर आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा किनारा ७२० किलोमीटर लांब आहे. एवढ्या मोठ्या किनारपट्टीचे रक्षण करणे हे खारफुटीचे सर्वांत महत्त्वाचे योगदान आहे.

खारफुटीच्या जंगलात ४८.७९ चौरस किलोमीटरने वाढ
सर्व जिल्ह्यांत खारफुटीच्या जंगलात ४८.७९ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे.ठाणे खारफुटीची एकूण वाढ ६.४६ चौरस किलोमीटर आहे. मुंबई आणि रायगडमध्ये अतिरिक्त १२.९ आणि २२.२ चौरस किलोमीटरच्या खारफुटीच्या वनक्षेत्रात वाढ आहे. पालघर जिल्ह्यात दाट मॅनग्रोव्हमध्ये ८.७३ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे.

खारफुटी म्हणजे काय?
खारफुटी हा समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात खारफुटी वाढते. समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण खारफुटीची मुळे सहन करू शकतात साेबतच लाटांबरोबर होणारी जमिनीची धूपही थांबवतात. खाड्या, समुद्र किनारी असणाऱ्या दलदलीत वाढणाऱ्या वनस्पतींना एकत्रितपणे तिवरे म्हटले जाते.

२०१८ - १९ मध्ये उपलब्ध खारफुटीच्या आकडेवारीची तुलना २००५ सालाशी करण्यात आली. २००५ ते २०१८ च्या कालावधीमध्ये दाट खारफुटीमध्ये १००.३५ चौरस किलोमीटरने वाढ झाली. विरळ खारफुटीची मर्यादा १०१.१२ चौरस किलोमीटरवरून घटून ५३.५५ चौरस किलोमीटरवर आली.विरळ खारफुटीचे दाट खारफुटीमध्ये मोठे रूपांतरण झाले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coastal protection will now be helped as the Tiwari forest grows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.