'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
By मनीषा म्हात्रे | Updated: November 1, 2025 06:50 IST2025-11-01T06:48:31+5:302025-11-01T06:50:15+5:30
पवई ओलीस नाट्यात अडकलेल्या सह दिग्दर्शक रोहन आहेर यांनी कथन केला थरार

'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
मनीषा म्हात्रे
मुंबई : 'लेट्स चेंज ४' या प्रोजेक्टचे शूटिंग सुरू होते. मी थिएटर ट्रेनर म्हणून मुलांना अभिनय शिकवत होतो. दोन महिन्यांपासून तयारी चालू होती, पण त्या दिवशी सगळे बदलले. सकाळी मुले आली, शूट सुरू झाले. पण, मला कल्पनाही नव्हती की हे सगळे एक दिवस इतके भयानक वळण घेईल, असा थरार पवई ओलीस नाट्यादरम्यान चिमुकल्यांना वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि सह दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या रोहन आहेर यांनी सांगितला. आम्ही जे करत होतो ते एक 'फेक सीन' होते, पण तो त्याला वास्तवात आणत होता. तो म्हणत होता की दीपक केसरकर यांनी अन्याय केला. आम्ही त्याचे म्हणणे ऐकायचा प्रयत्न केला, पण त्याचा ताबा सुटला होता.
या प्रोजेक्टचा उद्देश 'स्वच्छता मॉनिटर' याअंतर्गत मुलांमध्ये जागृती घडवायची, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवायचा, असा होता. दोन महिन्यांपूर्वी पहिली बैठक झाली. एकूण ५० मुले होती, त्यातून निवड करायची होती. २९ तारखेला निवड प्रक्रिया संपली होती, पण आर्याने अजून एका दिवसाची परवानगी घेतली. सकाळपासून वातावरण आनंदी होते. मुले हसत होती, सराव करत होती. मी त्यांना संवाद शिकवत होतो, असे आहेर यांनी सांगितले.
पेट्रोल व फटाके घेऊन ये...
रिअॅलिटी हवी मध्यंतरी त्याचा कॉल आला-त्याने मला सांगितले, 'पेट्रोल आणि फटाके घेऊन ये. सीनला रिअॅलिटी हवी.' ' मला थोडे विचित्र वाटले. 'लहान मुलांचं शूट आहे, असं का हवंय?' असे मी विचारले मात्र तो उत्तर देत नव्हता.
दोन दिवसांपासून त्याचे वर्तन मला संशयास्पद वाटत होते. त्याने दरवाजाचे वेल्डिंग करून घेतले होते. नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. खिडक्यांना लॉक लावले होते, अशी माहितीही आहेर यांनी दिली. याबाबत आर्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, 'सेट सुरक्षित ठेवण्यासाठी हे हवे. पण, मला आतून अस्वस्थता वाटत होती. त्या दिवशी सकाळी मी वरच्या मजल्यावर गेलो.
पुढे आलास तर आग लावेन...
आर्याच्या हातात लायटर होते. मुलांच्या शेजारी त्याने कपड्यावर रबर सोल्युशन ओतले आणि म्हणाला, 'पुढे आलास तर आग लावेन.' काही वेळाने मुलांना कोंडलेल्या खोलीची हातोड्याने काच फोडली. त्याच क्षणी त्याने माझ्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारला. डोळ्यांची आग-आग झाली, पण मी पुन्हा उठलो. जिन्यावरून खाली आलो आणि मुलांकडे धाव घेतली. त्यांना पाणी दिले, त्यांचे लक्ष विचलित केले. बाहेर पोलिस आले होते. त्यांनी सांगितले, 'एक खाचा तयार करा, आम्ही मागून येतो.'
क्षणात घडले
मी हातोडा घेतला आणि ग्रील तोडायला सुरुवात केली, अशी माहिती आहेर यांनी दिली. त्याचदरम्यान तो पुन्हा ओरडला 'मी आग लावणार आहे!' त्याने पुन्हा लायटर उचलले. बंदूक दाखवल्याने मी आणखी गोंधळलो. त्या क्षणी पोलिस मागून खिडकी फोडून आत घुसले. सगळे काही क्षणात घडले.
...म्हणूनच आरए स्टुडिओची निवड
ओलीस नाट्याचे संपूर्ण नियोजन रोहित आर्याने इतक्या बारकाईने केले होते की त्यासाठी निवडलेली जागाही त्याच्या कटाचा महत्त्वाचा भाग ठरली. पवईतील हा स्टुडिओ आर्याने स्वतःच बुक केला होता. दुहेरी मजल्याचा (ड्युप्लेक्स) असलेला हा स्टुडिओ बाहेरून साधा दिसत असला तरी त्याची रचना ओलीस नाट्याच्या योजनेसाठी अगदी योग्य होती. तळमजल्यावरील मोठ्या हॉलमध्ये चित्रीकरणाशी संबंधित मंडळी आणि काही विद्यार्थ्यांचे पालक बसवले गेले होते. वरच्या मजल्यावर दोन खोल्या होत्या. एका खोलीत काही मुले, तर तर दुसऱ्या खोलीत उरलेली मुले आर्याने 'सीनच्या तयारी'च्या बहाण्याने ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात तीच खोली बंदिस्त जागा बनली. या दोन्ही मजल्यांना जोडणारा एकच जिना होता. त्या जिन्याच्या टोकावर बसवलेला सुमारे दोन ते अडीच इंच जाडीचा जाड काचेचा दरवाजा बंद होताच वरची मंडळी आणि खालची मंडळी खाली राहिली. त्यामुळे वरती १७ मुले दोन महिला अडकल्या. तर खालच्या मजल्यावर रोहन ४ आहेर राहिला होता. त्यामुळे आतमध्ये २० जण असले तरी १९ जणांना त्याने ओलीस धरले होते, असे पोलिसांनी सांगितले.