Join us
Daily Top 2Weekly Top 5

CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 07:34 IST

Mumbai CNG Supply News: मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात रविवारी खंडित झालेला सीएनजी पुरवठा मंगळवारी दुपारी ३.३० पर्यंत पूर्ववत झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात रविवारी खंडित झालेला सीएनजी पुरवठा मंगळवारी दुपारी ३.३० पर्यंत पूर्ववत झाला. परंतु त्यानंतर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहने सीएनजीसाठी एकाच वेळी पंपावर पोहोचल्याने त्यांच्या रस्त्यांच्या कडेला वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अनेक वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार २ तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत थांबल्यानंतर सीएनजी मिळाला. 

ट्रॉम्बे येथील महानगर गॅसच्या मुख्य पुरवठा पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे रविवारपासून वडाळा येथील स्टेशनमधून मुंबईतील सीएनजी पंपांवरील थेट गॅसपुरवठा बंद झाला होता. ‘सीएनजी’च्या तुटवड्यामुळे सोमवारी खासगी वाहनांसह रिक्षा, मीटर टॅक्सी, ऑनलाइन टॅक्सींना फटका बसला. दरम्यान,   मुख्य गॅस पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशनचा गॅस पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. 

मुंबईत बेस्ट बससाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा 

मुंबई व उपनगरातील रिक्षा-टॅक्सी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना सीएनजी तुटवड्याचा दोन दिवसांपासून मोठा फटका बसला. एकीकडे या सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झालेला असताना मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट वाहतुकीवर मात्र याचा परिणाम झाला नाही. बेस्टच्या ताफ्यात ११०० पेक्षा जास्त सीएनजी बस असून, १६ बेस्ट आगारात सीएनजीचा पुरवठा होतो. या पार्श्वभूमीवर या काळात बेस्ट वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी महानगर गॅसकडून बेस्टला कमी दाबाने सीएनजी पुरवठा सुरू ठेवला होता. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी सेवा सीएनजीअभावी ठप्प असताना मुंबईकरांसाठी बससेवा सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची बससाठी गर्दी झाली.  सीएनजी तुटवड्याचा फटका रिक्षा, टॅक्सी परिणामी मुंबईकरांना मागील २ दिवसांपासून बसत आहे. याचा परिणाम बेस्ट उपक्रमालाही बसण्याची भीती होती.  

ठाण्यात ५० तासांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा

- तब्बल ५० तासांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यातील सर्वच १३ सीएनजी केंद्रे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली. या सर्व ठिकाणी रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कार चालकांनी दोन ते तीन तास आणि दोन ते तीन किलोमीटरच्या रांगेत उभे राहून आपल्या वाहनामध्ये सीएनजीचा भरणा केला.

- सीएनजी कमी दाबामध्ये का होईना सुरू झाल्याने चालकांसह प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारचा बिघाड झाल्याची माहिती ठाण्यातील माजीवडा येथील पंप चालकांनी दिली. मुंबईत वडाळा येथील आरसीएफ कम्पाउंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनमध्ये १६ नाेव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास  झालेल्या बिघाडामुळे मुंबईसह ठाण्यातील हजारो वाहनांना गॅस उपलब्ध झाला नाही. 

- ठाण्यातील खाेपट आणि इंदिरानगर येथील पंप सोमवारीही सायंकाळपर्यंत कमी बाराच्या दाबामध्ये सुरू होते. त्यामुळे या दोन ठिकाणी सोमवारीही वाहनांच्या मोठ्या रांगा  होत्या. या  दोनसह  कासारवडवली, कापूरबावडी, माजीवडा- युनिव्हर्सल, कोपरी, तीन पेट्रोल पंप,  खोपट  एसटी स्टॅन्ड आणि कॅसलमिल येथील गणेश  पेट्रोलियम आदी १३ केंद्रावर मंगळवारी दुपारी सीएनजीचा पुरवठा सुरू झाला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai CNG Supply Restored After 3 Days, Commuters Breathe Relief

Web Summary : Mumbai's CNG supply resumed Tuesday after a three-day disruption caused by pipeline damage. Long queues formed at pumps as vehicles rushed to refuel. BEST buses maintained service, averting complete transport chaos. Thane's CNG stations also normalized after a 50-hour wait, easing commuter woes.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र