Join us  

मुख्यमंत्र्यांचा हात पवारांच्या जबड्यात! भाजपा - राष्ट्रवादीतील संघर्ष तीव्र होणार

By यदू जोशी | Published: April 08, 2018 6:06 AM

‘चहावाल्याच्या नादी लागाल, तर औषधालाही शिल्लक राहणार नाही,’ अशा शब्दांत आव्हान देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारच्या भाजपा महामेळाव्यात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जबड्यात हात घातला.

मुंबई : ‘चहावाल्याच्या नादी लागाल, तर औषधालाही शिल्लक राहणार नाही,’ अशा शब्दांत आव्हान देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारच्या भाजपा महामेळाव्यात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जबड्यात हात घातला. ‘सत्तेत शिवसेनेबरोबर, पण जवळीक राष्ट्रवादीशी,’ या स्थितीतून बाहेर पडत, थेट पवारांना अंगावर घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे घेतल्याने, भाजपा-राष्ट्रवादीतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.महामेळाव्याला प्रचंड गर्दी जमविण्यात भाजपाला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या चेहऱ्यावर या गर्दीचे समाधान महामेळाव्याच्या वेळी स्पष्टपणे दिसत होते. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला, तो मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांना आव्हान देणारे अनेक नेते संपले वा त्यांनी पवारांशी जुळवून घेतले. आपल्या वयाइतका संसदीय कारकिर्दीचा अनुभव असलेल्या पवारांसमोर मुख्यमंत्र्यांनी जाहीररीत्या दंड थोपटले.राजकीय खेळींमध्ये निपूर्ण पवारांवर थेट हल्लाबोल करण्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळतच असणार, तरीही त्यांनी जोखीम पत्करली. एका विशिष्ट काळात गोपीनाथ मुंडे यांनी ती पत्करली आणि युतीची सत्ता पहिल्यांदाच महाराष्ट्रात येण्यास त्यामुळे मोठी मदत झाली होती. मुंडेंचा अपवाद सोडला, तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे जाहीरपणे सांगणारे. मात्र, एकीकडे पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादीने भाजपावरील हल्ले तीव्र केलेले असताना, ‘बोट(धरू)चेपेपणाची भूमिका घेऊन चालणार नाही, हे ओळखून मुख्यमंत्र्यांनी बारामतीकरांवर शरसंधान साधले, असे दिसते. मोदींविरोधातील सर्व शक्तींना एकत्रित आणण्यासाठी पवारांनी राष्ट्रीय स्तरावर घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन, त्यांच्यावर निशाणा साधण्याबाबत मुख्यमंत्र्यांना भाजपाश्रेष्ठींनीही ‘ग्रीन सिग्नल’ दिलेला दिसतो.सरकारमध्ये शिवसेना सोबत असताना आपले नेते राष्ट्रवादीला गोंजारत असल्याने, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता उशिरा का होईना, फडणवीस यांनी ओळखली हे बरे झाले. आघाडी सरकारमधील घोटाळ्यांचा विषय केवळ छगन भुजबळांपुरताच मर्यादित राहणार नाही, अशी आता तरी अपेक्षा आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला हल्लाबोल, शिवसेनेचा त्रास, कर्जमाफीवर झालेलीचौफेर टीका, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत नीट पोहोचत नसल्याची ओरड, समाजमाध्यमांतून महागाईआदी मुद्द्यांवर होत असलेली टीका, यामुळे भाजपाचा कार्यकर्ता नाऊमेद झाला होता. शुक्रवारच्या महामेळाव्याने त्याला नवा आत्मविश्वास दिला. भाजपाच्या राज्यातील ताकदीचे विराट दर्शन महामेळाव्यात निश्चितच घडले. कार्यकर्ता ‘चार्ज्ड’ झाला. भाजपाच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एनडीएचे सरकार नक्कीच येईल, असा विश्वास व्यक्त करीत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला सोबत घेण्याची भूमिका मांडली.युतीची अपरिहार्यता दिसलीमुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला. केंद्रातील सध्याचे भाजपाविरोधी वातावरण, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक लक्षात घेता, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव भाजपाला झालेली दिसते. पुन्हा सत्तेत यायचे, तर युती ही आपलीदेखील अपरिहार्यता आहे, हे जाणून शिवसेनेही पुढच्या काळात भूमिका घेतली, तर युतीचा मार्ग निर्धोक होईल.गडकरी यांचे राष्ट्रीय राजकारणाचे संकेतशुक्रवारच्या महामेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाचा अजेंडा मांडताना हिंदीतून भाषण केले आणि राष्ट्रीय राजकारणातच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :भाजपाराष्ट्रवादी काँग्रेस