Join us  

Uddhav Thackeray: राज्यात गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 6:34 PM

गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यात रविवारी 31 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या 31 नव्या प्रकरणांपैकी 27 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, 1 जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा 141 वर पोहोचला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व पालकमंत्र्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. 

गेल्या 20 दिवसांत राज्यभरात कोरोनाच्या सक्रीय रुग्ण संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असं राज्य सरकारनं याआधीच म्हटलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. आज राज्याच्या मंत्रिमडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी निर्देश दिले.

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाला आहे. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये, रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जिम, स्पा, हॉटेल्स, थिएटर्स आणि सिनेमा हॉलसाठी 50 टक्के क्षमतेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

लग्नात केवळ 100 लोकांनाच परवानगी -

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 पेक्षा अधिक किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के, यांपैकी जे कमी असेल तेवढीच असावी, अशी मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने जारी केली आहेत. या शिवाय, क्रीडा स्पर्धांदरम्यान क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांनाच भाग घेण्याची परवानगी असेल.

टॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस