Join us  

'जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही'; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

By मुकेश चव्हाण | Published: October 21, 2020 5:57 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील निशाणा साधला आहे.

मुंबई/उस्मानाबाद : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मदतीसाठी केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे राज्य चालवायला हिंमत लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील निशाणा साधला आहे. जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे.  याचदरम्यान उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्याशी संवादसाधला आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. नुकसान मोठं आहे. मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दरम्यान, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत फडणवीस यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यावर टीका केली होती. ''तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखला जातात. त्यामुळे तुम्ही लगेच नरेंद्र मोंदीची तुलना करुन घेवू नका'' असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकार