Join us  

‘मुख्यमंत्री-पवार यांची भेट राजकीय नव्हती’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 6:20 AM

अजित पवार म्हणाले, राज्यातील अनेक लोक शरद पवार यांना भेटत असतात. त्यांच्या समस्या सांगत असतात. त्या समस्या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचे असतील, म्हणून त्या दोघांची भेट झाली असेल.

ठळक मुद्देराज्यातील काही विषयांवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात काही काळ चर्चा झाली.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. अन्यथा मला आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही बोलावणे आले असते, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीत कसलेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी २ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाच्या वेतनाचे योगदान दिले आहे. 

अजित पवार म्हणाले, राज्यातील अनेक लोक शरद पवार यांना भेटत असतात. त्यांच्या समस्या सांगत असतात. त्या समस्या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचे असतील, म्हणून त्या दोघांची भेट झाली असेल. शरद पवार मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. महाविकास आघाडी सरकारविषयी काही बोलायचे असते, तर त्यांनी मला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही बोलावले असते. आमच्या पक्षापुरतीच चर्चा असती तर आम्हा दोघांना तरी बोलावले असते, असे काहीही झाले नाही. माध्यमांनी विनाकारण प्रत्येक वेळी अशा भेटीचे वेगवेगळे अर्थ काढणे थांबवले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

राज्यातील काही विषयांवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात काही काळ चर्चा झाली. त्याचवेळी महाराष्ट्र सदनाच्या कथित घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वर्षावर पोहोचले. त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. दोघांनीही भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर तिघांमध्ये काही काळ राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस