Join us

इंदापूरच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाकित; न बोलता जाहीर केलं 'तिकीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 16:37 IST

हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित आहेत

मुंबई - हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही गेल्या 5 वर्षांपासून पाटील यांच्या प्रवेशाची वाट पाहत होतो. मात्र, अतिशय योग्यवेळी त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. इंदापूर तुमचा परिवार आहे, तसाच भारतीय जनता पक्षही एक परिवार आहे. हा पक्ष एका परिवाराचा नसून पक्षच परिवार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. 

हर्षवर्धन यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळेल. भाजपा सरकारने मोदींच्या नेतृत्वात धाडसी घेतले. त्यामुळे भाजपात मोठी मेगाभरती सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपा, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष मिळून पूर्वीपेक्षाही अनेक जागा जिंकतील. त्यामध्ये आता इंदापूरच्याही जागेचा समावेश झाला आहे, असे म्हणत इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित केल्याचं सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीसांच्या या विधानानंतर तेथे उपस्थित इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित आहेत. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला असून, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देखील पाटील यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे.   

टॅग्स :भाजपाशिवसेनामुंबईइंदापूरविधानसभा