Join us  

मुख्यमंत्री व्हायचं ठरताच एकनाथ शिंदेंनी केले बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण; शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:48 PM

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ही राज्याच्या राजकारणाला मिळालेली मोठी कलाटणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई: एकामागून एक घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आपण मुख्यमंत्री होणार हे समताच एकनाथ शिंदे यांना प्रथम शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण आली. लगेचच एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला.

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक खास फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, हा बाळासाहेबांच्या विराचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा विकास, सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. सर्वांच्या साथीनं विकासाचा गाडा पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असेही ते म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

पत्रकार परिषदेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाचा भाग असणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांना लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अवघ्या काही तासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मंत्रिमंडळात राहावे आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार नव्हते. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, तर दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच शुभेच्छाही दिल्या आहेत.  

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळशिवसेना