Join us  

“मराठा आरक्षण टिकणार नाही हे कोणत्या आधारावर म्हणता?” CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 4:55 PM

CM Eknath Shinde Over Maratha Reservation: आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही, अशा प्रकारचे काम राज्य सरकारने केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde Over Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळे वळण घेताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसटीआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या. आता पोलिसांकडून अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप हटवण्यास सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. यातच राज्याच्या सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

मंडप हटवत असल्याचे समजताच मनोज जरांगे उपचार सोडून आंदोलनस्थळी जाण्यास निघाले होते. मात्र, पोलिसांनी समजूत काढत त्यांना रोखले. यावर,  मंडपाला, छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुंबईतील विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना, मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळावरून मंडप काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. मनोज जरांगेंच्या साखळी उपोषणाबाबत आपण काय आवाहन कराल, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे

खरे म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे. जुन्या कुणबी नोंदी शोधून त्याचे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा पाहिजे, त्या त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, समाजावर अन्याय न करता आरक्षण दिले आहे. हे आम्ही वारंवार सांगतोय की, सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कालही स्पष्ट होती, आजही स्पष्ट आहे आणि उद्याही स्पष्ट राहणार आहे. 

चार लाख लोक काम करत होते, हे आरक्षण टिकणार आहे

आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी ज्यांना होती, ती त्यांनी दवडली. मराठा समाजाला न्याय दिला नाही. मराठा समाजाच्या जीवावर खूप राजकीय लोक मोठे झाले. मात्र, मराठा समाज वंचित राहिला. याच मराठा समाजाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा इतक्या वर्षांनी पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मुंबई उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकले. दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झाले. परंतु, आम्ही यावेळेस देताना सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण, त्रुटी नोंदवलेल्या आहेत. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास कसा आहे, हे सर्व पटवून त्याचा सर्व्हे केला आहे. सविस्तर सर्व्हे केला आहे. चार लाख लोक काम करत होते. हे आरक्षण टिकणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

मराठा आरक्षण टिकणार नाही हे कोणत्या आधारावर म्हणता?

विरोधकांना मी सांगू इच्छितो की, आताच आरक्षण दिले आहे. आताच जीआर काढला आहे. तुम्ही आतापासूनच टिकणार नाही, हे कोणत्या आधारावर म्हणता, अशी विचारणा करत का टिकणार नाही, याची कारणे तरी द्या आणि ते का टिकणार, याची कारणे आमच्याकडे आहेत. आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केले होते, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केले होते, मग ते आता सरकारने दिले आहे. सरकार प्रत्येक गोष्ट करत आहे. मला वाटते की, हे आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही, अशा प्रकारचे काम राज्य सरकारने केले आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलविधान भवन