Join us  

मुंबईची तुंबई झाली; पण, CM एकनाथ शिंदे म्हणतात, “पावसाच्या आगमनाचे स्वागत करा”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 11:53 AM

CM Eknath Shinde News: पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचे आनंदाने स्वागत करुया, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde News: मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच  रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली. गेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सगळ्यात जास्त पाऊस ५.३० ते ७.३० या वेळेत पडला आहे. या काळात ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात नेहमीप्रमाणे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मुंबई महानगरपालिकेचे सर्व दावे पुन्हा एकदा फोल ठरल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.  

शनिवारी मुंबई आणि उपनगरांतील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. दक्षिण आणि मध्य मुंबईच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. कमरेपर्यंत पाणी, गाड्यांना रस्सीने बांधण्याची नामुष्की मुंबईकरांवर आली आहे. यासंदर्भात शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत साचलेल्या पाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. त्याचे स्वागत करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

पावसाच्या आगमनाचे स्वागत करा

पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याबाबत प्रश्न विचारला. यावर, मुख्यमंत्री शिंदे यांनी तुंबलेल्या मुंबईवर न बोलता आलेल्या पावसाचं स्वागत करा असे आवाहन केले. अरे बाबा, पाऊस झाला याचे स्वागत करा. पाणी साचले हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत. पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचे आनंदाने स्वागत करुयात. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ४८ तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील ५ दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई मान्सून अपडेटमानसून स्पेशल