Join us  

BLOG: 'हॅलो, CM शिंदे साहेब...मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...'

By मोरेश्वर येरम | Published: July 05, 2022 1:24 PM

हॅलो...CM साहेब मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...नाव सांगत नाही. कारण नावापेक्षा मी एक मराठी माणूस आहे आणि सर्व मराठी माणसांच्यावतीनं तुमच्याशी संवाद साधतोय असं समजा.

- मोरेश्वर येरम

हॅलो...CM साहेब मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...नाव सांगत नाही. कारण नावापेक्षा मी एक मराठी माणूस आहे आणि सर्व मराठी माणसांच्यावतीनं तुमच्याशी संवाद साधतोय असं समजा. खरंतर तुम्ही फोन उचलून माझं म्हणणं ऐकून घेताय यातच तुमचं सर्वसामान्यपण दिसून येतं. आता तुम्ही मुख्यमंत्री झालात तर तुमची जबाबदारी वाढलीय. प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये रमणारा नेता म्हणून तुमच्याबद्दल ऐकलंय. आता मुख्यमंत्री झालात तरी तुमच्या मूळ स्वभावात बदल होईल असं वाटत नाही आणि तो करण्याची माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाला गरजही वाटत नाही. 

नेता म्हटलं की तो शुभ्र चकाचक इस्त्रीची घडी देखील न मोडलेले कपडे, रस्त्यात चार माणसं पाहून थांबतील अशी आलिशान कार आणि सिक्युरिटी गार्डचा गराडा असं चित्र सध्याच्या राजकीय पटलावर पाहायला मिळतं. तुमच्याही बाबतीत ते आहेच. पण तुम्ही अगदी लहानसहान कामातही स्वत: जातीनं लक्ष देता, तिथं उपस्थित राहता आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता वावरता हे तुमचं गुणवैशिष्ट्य आहे.

एक हाडाचा कार्यकर्ता आणि सर्वसामान्य मराठी माणूस राज्याच्या प्रमुखपदी विराजमान झाला याचा खरंच मनापासून आनंद आहेच. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. पण साहेब आता मुद्द्यावर येतो. गेल्या १०-१२ दिवसात आम्ही टीव्हीवर जे काय पाहिलंय त्यानं खरंच हे नेमकं काय सुरूय असा प्रश्न पडलाय. इतकी गुंतागुंत. माझ्यासारख्या सामान्य माणसाचं डोकं भंजाळून गेलं. महत्वाकांक्षेपेक्षा स्वाभीमान महत्वाचा असतो हे मान्यच. तुम्ही म्हणालात तसं इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतरही तुमचं खच्चीकरण, कटकारस्थान झालं असेलही. तुम्ही दुखावलेही गेला असाल. हे सारं मान्य. पण यात मराठी माणसाच्या हाती काय लागणार? आमच्या मनाचं काय? ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे गणित आता कुठं चुकतंय का? साहेब याचा विचार नक्की करा. 

मराठी माणूस म्हणून आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मतदार असल्यामुळे अपेक्षा व्यक्त करणं आणि त्या बोलून दाखवणं हक्क समजतो. फक्त आमचं ऐकलं जाणं आणि आमच्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र अख्ख्या देशाला दिशा देतो. सर्वाधिक पैसा देतो आणि कमावतोही. तरी स्थानिक पातळीवर प्रश्न अजूनही तसेच आहेत. जसं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना, जिल्हाप्रमुखांना, शाखाप्रमुखांना खूश ठेवणं महत्वाचं वाटतं. तितकंच किंवा त्याहून जास्त सर्वसामान्य माणसांना खूश ठेवाल अशी आशा आहे. 

मराठी माणसाला आज फार काही नकोय. कारण काम कधीच संपत नसतं. अडचणी येत असतात. आपल्या सरकारचं राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष असावं इतकीच भोळीभाबडी अपेक्षा आहे. पण सध्या तसं काहीच होताना दिसत नाही. हे जर असचं राहील तर आमची मतदानाची इच्छा गुदमरुन जीव सोडून देईल. सध्याच्या राजकीय उलथापालथीचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही. हे जितकं तुम्हाला घातक आहे तितकंच जनतेला अन् देशाच्या लोकशाहीलाही. मतदाराला मतदान करण्यातच स्वारस्य राहीलं नाही मग जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशाचं साध्य ते काय?     

असो. शिंदे साहेब आता तुम्ही मुख्यमंत्री झालात. हे सरकार तरी आता टिकाव धरेल असं समजतो. झालं गेलं सारं मागे सारुन द्या. राजकीय कुरघोड्यांमध्ये अडकू नका. कोरोनात सगळी तारांबळ उडाली. अनेकांनी जीव गमावला, नोकऱ्या गेल्या, महागाई वाढली. तरी सर्वसामान्य माणूस लढतोय. सारं गोड मानून सगळं विसरुन पुढे जातोय. जगणं थांबत नसतं. पण आयुष्याच्या महामार्गातील अडसर दूर करुन फुंकर घालण्याचं काम केलं, तरच खरी 'समृद्धी' घराघरांत नांदेल असं मनापासून वाटतं. 

पाऊस सुरू झालाय. पूर परिस्थिती निर्माण होतेय. तर काही ठिकाणी अजूनही बळीराजाच्या कपाळावरील आठ्या तशाच आहेत. नुकतंच माजी मंत्र्यांच्या केबिनमध्ये फाईलचा खच पडल्याचा व्हिडिओ पाहिला आणि काळजात धस्स झालं. मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे पदांचं गौडबंगाल आता मागे सारा अन् कामाला लागा. तुमच्या आनंदात आमचाही आनंद आहेच. पक्षीय राजकारणामुळे मराठी माणूस कितीही विभागला गेला तरी आपलं काम कोण करतंय? हेच आम्हाला आजही महत्वाचं वाटतं. बरं आता थांबतो. तुम्ही इतकं ऐकून घेतलंत. त्याबद्दल खूप आभारी. पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा..

जय महाराष्ट्र!

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळशिवसेना