Join us

धान्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:25 IST

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नॉन ब्रॅण्डेड अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर नव्याने लावण्यात आलेला पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला दिले. 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ब्रॅण्डेड अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर १८ जुलैपासून पाच टक्के जीएसटी आकारण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जीएसटीमुळे राज्यातील सामान्य जनतेबरोबर व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या तीव्र भावनांची माहिती मुख्यमंत्र्यांना देत, हा कर रद्द होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनशिष्टमंडळाने केले. 

व्यापारी व जनतेच्या भावनांशी आम्ही सहमत असून, हा कर रद्द करावा, यासाठी राज्य सरकार केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच व्यापार, उद्योग क्षेत्राच्या विविध प्रश्नांसंबंधी चेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करू, असे आश्वासन  मुख्यमंत्र्यांनी दिले. या शिष्टमंडळात संदीप भंडारी, आशिष नहार, निरव देडिया, विकास अच्छा, दीपक मेहता, सागर नागरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. 

टॅग्स :एकनाथ शिंदेजीएसटी