Join us

भारताच्या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना; शिंदे-फडणवीसांनी इस्त्रोला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:47 IST

Chandrayaan-3: चंद्रयान-३च्या उड्डाणाआधी देशभरातून अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, नागरिक शुभेच्छा देत आहेत.

मुंबई: सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले आहे. आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान अवकाशात झेपावणार असून, आतापर्यंत या रॉकेटने १०० टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपण तर यशस्वी होणारच; पण पुढे चंद्रावर ऐतिहासिक लॅण्डिंगच्या यशाबद्दलही शास्त्रज्ञ आशावादी आहेत. 

चंद्रयान-३च्या उड्डाणाआधी देशभरातून अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, नागरिक शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इस्त्रोच्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षेला इस्रोच्या अंतरिक्ष संशोधकांची साथ मिळाली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी चंद्रयान-३ सिद्ध झाले आहे. अंतरिक्ष संशोधनक्षेत्रातील भारताच्या या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, १४ जुलै २०२३ हा आपल्या देशासाठी खूप मोठा दिवस आहे. अवघ्या काही मिनिटांत इस्त्रो चंद्रयान-३ लाँच करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक शास्त्रज्ञ आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, चंद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाही. यावेळी स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन २१४५.०१ किलोग्रॅम असेल, त्यापैकी १६९६.३९ किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्यूलचे वास्तविक वजन ४४८.६२ किलो आहे.

टॅग्स :चांद्रयान-3इस्रोएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस