जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या, तर भोंदू खरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 07:03 IST2026-03-26T07:01:48+5:302026-03-26T07:03:27+5:30
दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे विधानसभेत पुन्हा ठणकावून सांगितले

जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या, तर भोंदू खरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता: CM फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचा सल्लागार नेमला असता. मग युद्ध आपण ड्रोनऐवजी लिंबू-मिरचीने लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण इथे बसून टोचणीने संपवले असते. सीमेवर सैनिकांऐवजी पाच-दहा भोंदूबाबा पाठवले असते तर आपली सीमा सुरक्षित झाली असती. सर्वात महत्त्वाचे आपल्याला प्रचार सभाच घ्याव्या लागल्या नसत्या एका ठिकाणी बसूनच सगळ्या निवडणुका जिंकता आल्या असत्या. सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कुणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा, ज्यात दुसऱ्याचे अहित होते ती कधीच श्रद्धा असू शकत नाही, असे सांगत भोंदू खरात विरोधात राज्य सरकार कडक कारवाई करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत ठणकावून सांगितले.
जरब बसेल अशी कारवाई
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विकृत खरात प्रकरणी ज्यांच्याकडे माहिती असेल ती त्यांनी शासनाकडे द्यावी, असे आवाहन केले. या प्रकरणाची पाळेमुळे खणून त्याला अशा प्रकारे दंडित करायचे आहे की, अशा प्रकारे वागणाऱ्या लोकांना जरब बसली पाहिजे. या प्रकरणाने आपण कुठे जात आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खरात मुळात कॅप्टनपण नाही हे आता उघडकीस आले आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी आपण या प्रकरणात ताकदीने केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील मंत्र्यांच्या घरी
भोंदुबाबा अशोक खरात ७ मार्च रोजी दिवसभर एका मंत्र्यांच्या पुण्यातील घरी मुक्कामाला होता. सरकारला त्याची कृत्य माहिती होती. पण ही खुर्चीची लढाई होती. दिल्लीला जाऊन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करत होते, तर इकडे मुख्यमंत्र्यांना वाटत होते आपली खुर्ची जाते आहे. यात आधी कारवाई का केली नाही, महाराष्ट्राला काळीमा लावणारी ही घटना आहे. त्याला फाशी झाली पाहिजे, सरकारने तसा पाठपुरावा केला पाहिजे. राज्यातील असे भोंदुबाबा सरकारने शोधून काढले पाहिजेत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सांगितले.
‘खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा काही सत्ताधारी नेत्यांकडूनच प्रयत्न’
महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप असलेला नाशिक येथील भोंदुबाबा अशोक खरातच्या माध्यमातून सरकारमधीलच काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांनी कारस्थान रचले होते, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला.
विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आव्हाड यांनी या प्रकरणात अंधश्रद्धा, जादुटोणा आणि राजकीय हस्तक्षेप यांचा धोकादायक संगम झाल्याचा आरोप केला.
काही मंत्री आणि आमदार खरातकडे पूजेसाठी जात होते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सरकारी निधीचा गैरवापर करून खरात अध्यक्ष असलेल्या ईशान्येश्वर देवस्थान परिसरात अनेक बांधकामे करण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींना सरकारकडून खरातला निधी पुरवण्यात आला.
खरातसोबतच या ट्रस्टमधील इतर सदस्यांच्या आर्थिक आणि जमिनींच्या व्यवहारांसोबत चौकशीची मागणी त्यांनी केली. खरातकडे मागील २० वर्षांतील अनेक राजकीय गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसेच खरातकडे अनेक नेत्यांची गुपिते असल्याने त्याच्या जिवाला धोका आहे, त्यामुळे त्याला चोवीस तास सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवावे, अशी मागणीही आव्हाड यांनी केली.
२००७मध्ये नाशिक जिल्ह्यात झालेल्या एका पत्रकाराच्या खून प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी खरातच्या या गुन्ह्यांची प्रशासन, पोलिस आणि काही राजकीय व्यक्तींना आधीपासून माहिती होती. त्यावेळीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला.
खरातप्रकरणी पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कोणत्या अधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले, याची चौकशी करावी, असेही आव्हाड म्हणाले.