CM Devendra Fadnavis: आम्ही धारावीच्या दहा लाख लोकांना घर देत आहोत. या सर्व लोकांना धारावीतच घर देण्यात येणार आहे. प्रत्येकाला घर देणारा आमचा हा प्रकल्प आहे. आमचे सरकार मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईच्या गिरणगावात राहणारा मराठी माणूस आज वसई विरार, कर्जतकडे फेकला गेला आहे. आम्ही मात्र बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला. म्हाडाच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांच्या हाती मुंबईची सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि लोकांचे स्वप्नही पूर्ण करता येत नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भाजपाच्या विजयी संकल्प मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. माझे विधान रेकॉर्ड करा, काहीही झाले तरी मुंबईत महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत
ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही. आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की, काहीही झाले तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झाले तरी मुंबई पालिकेवर महायुतीचेच सरकार येणार, असे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, आम्ही २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणून दाखवले. आता महापालिकेच्या निवडणुकीकडे आपण चाललो आहोत. आता काही झाले तरी मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुंबईत महायुतीचा महापौर केल्याशिवाय भाजपाचा एकही कार्यकर्ता राहणार नाही. कोणी बरोबर आले तरी किंवा कोणी बरोबर आले नाही तरी आणि कोणी कोणाला बरोबर घेतले तरी मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असा निर्धारही फडणवीसांनी बोलून दाखवला.