“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:25 IST2025-12-12T18:25:01+5:302025-12-12T18:25:46+5:30
CM Devendra Fadnavis News: राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योग सुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे.

“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
CM Devendra Fadnavis News: महाराष्ट्राला GCC हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वांत मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून १५ हजार थेट आणि ३० हजार अप्रत्यक्ष असे एकूण ४५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR , विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योग सुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मायक्रोसॉफ्टने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मायक्रोसॉफ्टने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करावा, याबाबत त्यांना विनंती केली असून, सध्या त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच आहे. आगामी काळात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करेल आणि महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आयोजित Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सत्या नडेला यांच्या सोबत झालेल्या या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावर चर्चा झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील त्यांच्या $17 अब्जांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राने विकसित केलेल्या मार्बल Marble प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे ३–४ महिन्यांच्या ऐवजी फक्त २४ तासांत शोधता येतात. ज्यामुळे लोकांचे पैसे वाचत आहेत आणि गुन्हेगारांना शोधणे अधिक जलद झाले आहे.