Join us

"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:28 IST

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हनी ट्रॅप संदर्भात केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले

CM Devendra Fadnavis on Honey Trap Case: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हे सगळे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप करुन विधानसभेत मोठा बॉम्ब फोडला होता. नाना पटोलेंच्या आरोपांनी विधानसभेत खळबळ उडाली होती. माझ्याकडे यासंदर्भातील पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो असंही नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर आता अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे कुठलेही प्रकरण समोर आलेलं नसल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्र याआधी सुसंस्कृत होता आणि आजही असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. सरकारने सांगितले तर तो पेनड्राईव्ह दाखवू शकतो असंही नाना पटोले म्हणाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच असल्याचे म्हटलं. 

"सभागृहात हनी ट्रॅपची चर्चा सुरु आहे. कोणचा हनी ट्रॅप आणला मला समजतचं नाही. नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. कुठली घटना घडली तर ती मांडली पाहिजे. यामध्ये आजी माजी मंत्र्यांचा उल्लेख केला जातोय.  त्यामुळे आजी माजी मंत्री एकमेकांकडे पाहत आहेत. कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाची तक्रार नाही. अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

"अशा संदर्भातील एक तक्रार नाशिकमधून आली होती. एका महिलेने तक्रार केली आणि ती मागेही घेतली. उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भातील ही तक्रार होती. आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा उल्लेख करत होता. ती व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष आहे. त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढली आहे. अशाप्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृहातून निघून जाणे योग्य नाही. नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारुढ पक्षाची बोलती बंद करुन टाकायची. महाराष्ट्र याआधी सुसंस्कृत होता आणि आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त जे विष पेरत आहेत त्यांना लगाम लावण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा इकडेतिकडे जात नाही," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :विधानसभादेवेंद्र फडणवीसनाना पटोले