CM Devendra Fadanvis on Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ एकाच दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित असणार आहे. त्यावर जरांगे-पाटील यांनीही मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. यावेळी जुन्नर येथून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजाचा अपमान करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्यानंतर मुंबईत माध्यमांशी बोलताना या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.
"शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजाच्या समोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करुन दुसऱ्याला काही देण्याचा प्रश्न नाहीये. दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आाहोत. त्यामुळे ओबीसी समजाने तुमच्यावर अन्याय होणार नाही हे लक्षात ठेवावे. मराठा समाजानेही लक्षात घ्यावं की आम्हीच सगळे प्रश्न सोडवले आहेत. दुसरे कोणी सोडवले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न मी मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुटले आहेत. आताही आम्ही सोडवणार आहोत. ईडब्ल्यूएस आरक्षण आल्यापासून बऱ्यापैकी प्रश्न सुटलेला आहे. आपल्याकडे ईडब्ल्यूएसची मानसिकता तयार झालेली नाही त्यामुळे काही प्रश्न आहेत. आपण आरक्षण दिलेले आहे आणि ते कोर्टात टिकलेले आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. "लोकशाहीत प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याचाही अधिकार आहे. कोणतेही आंदोलन जोपर्यंत लोकतांत्रिक आहे त्याच्याशी कोणतीही अडचण नाही. लोकतांत्रिक पद्धतीने जेवढी आंदोलने होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू, लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे उपाय करता येतील ते करू. पण माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही आंदोलन लोकशाहीच्या चौकटी बाहेर जाऊ नये. माननीय उच्च न्यायालय यासाठी चौकट टाकून दिली आहे. उच्चलयाने त्या संदर्भात काही नियम आणि निकष तयार केले आहेत. त्यांनी निकषानुसार जर आंदोलन झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही," अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
आंदोलन करणाऱ्यांनी अभ्यास करुन मागणी करावी
"ओबीसीमध्ये जवळपास साडेतीनशे जाती आहेत. मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसीचा कट ऑफ हा एसईबीसीच्या वर आहे आणि एसईबीसीचा कटऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे त्यामुळे किती भलं होणार आहे हे मला माहिती नाही. आपण नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे लक्षात येईल. मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून मागणी केली पाहिजे. यासाठी राजकीय आरक्षणाचा हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल तर मागणीचा योग्य प्रकारे विचार केला पाहिजे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.