“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:53 IST2025-08-22T14:50:43+5:302025-08-22T14:53:59+5:30
CM Devendra Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी RSS संबंधित राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
CM Devendra Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी संबंधित राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.
खासदार व अभिनेत्री कंगणा रानौत यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी संघाची महिला शाखा असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली होती. भगवा ध्वज, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि भारतमातेच्या तसबिरी असलेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतानाचा फोटो समोर आला होता. यावर खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरणही दिले होते. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
संघाचा स्वयंसेवक असल्याचा मला अभिमान आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंदी असलेली संघटना आहे का, अशी विचारणा करत, मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचे कल्याण करायचे आहे, अशीच शिकवण संघाने दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कुणी गेले, तर त्यावर एवढा आकांडतांडव करण्याची आवश्यकता का आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
दरम्यान, टीका होत असताना सुनेत्रा पवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी एक्सवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की, त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेची खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.