Join us

‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:37 IST

CM Devendra Fadnavis News: ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis News: पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. कर्त्या माणसांवर दहशतवाद्यांनी घातलेल्या घाल्याने अवघा देश पेटून उठला. त्या कुंकवाची आण घेऊन भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भीम पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया आल्या. अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा नवा भारत अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही. हे भारताने दाखवून दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक’ करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता. तसेच पहलगामध्ये ज्या प्रकारे आमच्या बांधवांना मारण्यात आले. त्यामधून संपूर्ण भारताच्या मनात संताप निर्माण झाला होता. संपूर्ण भारतीयांना समाधान वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सांगितले होते की पहलगामच्या घटनेचे प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही अशा प्रकारची घटना सहन करणार नाही. त्यानंतर अतिशय सबळ अशा प्रकारचं उत्तर भारतीय लष्कराने दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रश्न विचारला.

राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत देश या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. या कारवाईचे स्वागत करतो आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करते आहे आणि भारताच्या पाठिशी जग उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, हशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. ज्या दहशतवाद्यांनी तो हल्ला केला, ते दहशतवादी तुम्हाला अजून सापडलेले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती. हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून यांना शोधून काढणे हे गरजेचे आहे. एअर स्ट्राइक करून, लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवून, युद्ध करणे हा काय त्याला पर्याय होऊ शकत नाही. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायलाच हव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लाभारत विरुद्ध पाकिस्तानसर्जिकल स्ट्राइकराज ठाकरेदेवेंद्र फडणवीस