Join us
Daily Top 2Weekly Top 5

घातपात असल्यास कोणाचा बाप दोषी असेल तर त्याचा मुडदा खणून काढेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:21 IST

अजित पवार मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात जर कोणी घातपात केला असेल तर आकाश-पाताळ एक करेन, त्यामागे कोणाचा बाप जरी असला तरी त्याचा मुडदा खणून काढेन हे मी महाराष्ट्राला आश्वस्त करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावले.

रोहित पवार आणि अन्य काही आमदारांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून घात असल्याचा दावा केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अजितदादा हे रोहित पवारांचे काका होते. त्यांच्या भावना मी निश्चित समजू शकतो. पण अजितदादा माझेही जवळचे मित्र होते. गेल्या काही वर्षांत त्यांची माझ्यासोबत जी मैत्री जुळली तितकी त्यांची कोणासोबत नव्हती. त्यामुळे रोहित पवार हे पुतणे असले म्हणून तुमची या प्रकरणाच्या शोधाची तीव्रता जास्त व माझी कमी असे समजू नका.

कर्नाटकातील ‘तो’ एफआयआर बेकायदेशीर

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात कर्नाटकात जो झिरो एफआयआर नोंदवला आहे तोच बेकायदेशीर आहे. तसा अधिकारच कर्नाटकला नाही. अपघात प्रकरणात आधी एडीआर (ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट) नोंदविण्यात येतो. 

त्यानंतर जर अपघात नसून काही घातपात असेल तर तो एडीआरच एफआयआरमध्ये रूपांतरित होऊन त्याचे दोषारोपपत्र जाते. एफआयआरपेक्षा चार्जशीट महत्त्वाची असते. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा एफआयआर नोंदविला असेल. कदाचित राहुल गांधींच्या सल्ल्याने तो नोंदविला असेल असा टोलाही त्यांनी लगावला.

अमित शाह यांना भेटणार

फडणवीस म्हणाले की, एएआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यत पोहोचता येईल. याची नीट चौकशी झाली पाहिजे यात कोणाच्याही मनात शंका नाही. अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेळ घेणार आहे.

ऐन वेळी दुसरे पायलट नेमले हे काही खरे नाही 

ऐनवेळी पायलट नियुक्त झाले हे खरे नाही. राहुल ओबेरॉय व दिलिप सिंग यांना पायलट म्हणून नेमले होते. ओबेरॉय यांनी पोट खराब असल्याची सबब सांगितल्याने त्यांच्या ऐवजी सुमित कपूर व शांभवी पाठक यांना २७ जानेवारीलाच नेमले होते. दोघांचीही  ब्रेथॲनलायझर टेस्ट झाली होती. त्यात अल्कोहोलचा अंश सापडलेला नाही, असे फडणवीस म्हणाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis vows to unearth truth behind Ajit Pawar's accident, spares none.

Web Summary : Chief Minister Fadnavis assured the assembly he'd investigate Ajit Pawar's accident thoroughly, sparing no one. He dismissed claims of foul play, addressed the controversial Karnataka FIR, and planned to meet Amit Shah post-session for further inquiry. Pilot changes were clarified, ensuring sobriety checks were conducted.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसअजित पवारविधानसभा