मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:31 IST2025-07-14T16:31:24+5:302025-07-14T16:31:53+5:30
CM Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्याची बाब विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केली.

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
CM Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा परिसरात जल्लोष केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन करत असताना, ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी याबाबत काही मुद्दे उपस्थित केले. सीएसटी स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून नामकरण केले. परंतु, स्थानक परिसरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. आपल्या देशात पहिली रेल्वे आणण्याचे काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले?
भास्कर जाधव यांच्या माध्यमातून सभागृहाला सूचित करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनचा भव्य पुनर्विकास सध्या सुरू असून, स्टेशन तयार करताना जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्या आराखड्यात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मागच्या काळात एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळेस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला 'नाना जगन्नाथ शंकरशेठ' यांचे नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, सगळी प्रक्रिया पूर्ण केली. तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. तो तिथे अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधानांचे आभार मानतो. पंतप्रधानांकडे सात प्रस्ताव गेले होते. मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर केला. इतरांनी किल्ले हे महसुली गोळा करण्यासाठी वापरले. मात्र महाराजांनी हे किल्ले स्वराज्यासाठी वापरले. युनोस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे सादरीकरण झाले. यामध्ये मतदानाचा अधिकार २० देशांना असतो. या प्रस्तावावर सर्व २० देशांनी एकमताने निवड केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.