पार्किंग नसेल तर सरकार मुंबईकरांना देणार 'हा' नवा पर्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:25 IST2025-01-25T18:22:35+5:302025-01-25T18:25:56+5:30
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पार्किंग नसेल तर सरकार मुंबईकरांना देणार 'हा' नवा पर्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
Mumbai Parking Rules: राज्यातील वाहतूक समस्येतून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे सरकार नवीन धोरणाचा विचार करत आहे. या पॉलिसीद्वारे कार खरेदी करण्यापूर्वी डीलर्सना पार्किंगच्या जागेची माहिती देणे आवश्यक असणार आहे. मुंबईतील वाहतूक कमी करण्यासाठी सरकार असा निर्णय घेणार असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे कार खरेदीदारांना वाहन खरेदी करण्यापूर्वी पार्किंग जागेची सुविधा असणे आवश्यक असणार आहे. यासोबत पार्किंगची व्यवस्था नसेल तर सरकार मुंबईकरांना नवा पर्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबईमध्ये २०२४ या वर्षात दोन लाख ६४ हजार ३२४ खासगी वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामुळे सध्या संपूर्ण मुंबईत ४८ लाखांहून अधिक वाहने आहेत. दुसरीकडे, पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी नवीन रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. वाढत्या वाहनांमुळे कितीही रस्ते बनविले तरी ते अपुरेच पडत आहेत. त्यामुळे आता मुंबईत वाहन खरेदी करताना नोंदणीकृत पार्किंग असणे आवश्यक असणार आहे. असं असलं तरी पार्किंगची व्यवस्था नसणाऱ्या कार मालकांसाठी सरकारकडून पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सीएनबीसी-टीव्ही१८ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार या उपाययोजनांचा विचार करत आहे. "आम्ही मुंबईत असंख्य सार्वजनिक पार्किंग जागा तयार केल्या आहेत आणि आता एका समर्पित अॅपद्वारे त्या उपलब्ध करून देत आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"आम्ही मुंबईत असंख्य सार्वजनिक पार्किंग जागा तयार केल्या आहेत आणि आता आम्ही सर्व पार्किंगच्या जागा एका अॅपवर आणत आहोत. त्यामुळे जर तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुम्ही पार्किंगची खरेदी करू शकता किंवा मुंबई महापालिकेकडून पार्किंगची जागा भाड्याने घेऊ शकता. पण पार्किंगच्या जागेशिवाय कार खरेदी करणे आणि ती रस्त्यावर पार्क करणे हे शक्य होणार नाही. तुम्हाला माहिती आहे की शहरात किती गर्दी आहे आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी होतेय. आम्ही सध्या या योजनेचा विचार करत आहोत आणि लवकरच ही प्रणाली लागू होणार आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यामागील कल्पना कार मालकांना महापालिकेकडून पार्किंगची जागा खरेदी करून किंवा भाड्याने घेता येणार आहे. रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पार्क करण्यास परवानगी दिल्याने वाहतूक कोंडीत लक्षणीय वाढ होत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.