Join us

CM फडणवीसांनी विधान भवनाच्या सुरक्षारक्षांकाना झापले, घेतला मोठा निर्णय; नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:51 IST

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर रेटारेटी होते. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.

CM Devendra Fadnavis News: विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधकांनी लावून धरलेल्या मागणीला यश आले आणि अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनाच्या सुरक्षारक्षकांवर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात होणाऱ्या गर्दीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच मधल्या दलालांबाबत काही तरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. मंत्रालयात अनावश्यक वाढत चाललेल्या गर्दीमुळे अनेकदा तक्रारीचा सूर उमटल्याचे म्हटले जात आहे. हीच बाब आता विधिमंडळातही निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत सुरक्षारक्षकांना झापल्याचे समजते.

विधानभवन की जत्रा...

विधानभवनाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. दलालांचे उच्चाटन करणार, असा संकल्प नवीन सरकारने केला आहे, पण नजर टाकली की, एक-दोन दलाल तरी सहज दिसतात. त्यांना कोण पास देते माहिती नाही, पण मंत्रालय, विधानभवनात ऐटीत कसे मिरवायचे याची जुगाड टेक्नॉलॉजी त्यांना जमलेली आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात गर्दी होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तर रेटारेटी होती. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी विधानभवनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना झापले देखील. परिणामत: पासचे सर्रास वाटप आता बंद होणार आहे. त्यामुळे आता विधानभवनात मोकळा श्वास घेता येईल, अशी अपेक्षा आहे. ‘आपल्या’माणसांना बरोबर पासेस पुरविणारे विधानभवनातीलच काही लोक असू शकतात, त्यांना शोधले पाहिजे.

दरम्यान, नाशिक रोडच्या आमदार सरोज अहिरे २०१९ ते २०२४ या काळातही आमदार होत्या. गरोदर असतानाही त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होत असत. अडीच महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन त्या विधानभवनात आल्या होत्या, तेव्हा आपण सभागृहात गेल्यावर बाळाचा सांभाळ कसा होणार, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी आधीच विधानमंडळाचे लक्ष वेधलेले होते, पण तरीही अगदीच अस्वच्छ खोली बाळासाठी देण्यात आल्यावर त्या संतप्त झाल्या, त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. त्यावर मग लगबग झाली आणि विधानभवनाच्या पहिल्या माळ्यावर मंत्र्यांच्या दालनाच्या रांगेत टापटिप असा हिरकणी कक्ष बनविला गेला. यावेळी विधानभवनातील सगळी दालने चकाचक करण्यात आली आहेत. मात्र, पहिल्या माळ्यावरील हिरकणी कक्ष मात्र गायब झाला आहे. चौथ्या माळ्यावर हा कक्ष तयार केला जात आहे म्हणतात, पण अजून नक्की काहीच नाही.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसविधान भवनविधानसभाविधान परिषदराज्य सरकार