CM Devendra Fadnavis First Reaction Over Attack On Saif Ali Khan:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी मध्यरात्री अज्ञान हल्लेखोराने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या हल्लेखोराची चाहूल लागताच महिला कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर सैफ अली खान याने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. हल्लेखोर आणि सैफ अली खान या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यामध्ये सैफ अली खानवर अनेक वार झाले. पैकी दोन वार अतिशय गंभीर स्वरुपाचे होते. तातडीने सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान धोक्यातून बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात तीव्र आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. कायदा सुव्यवस्था आणि गृहमंत्रालयावर टीका केली जात आहे. यातच मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सैफ अली खानच्या घरी जी घटना घडली, त्याबाबत केलेल्या प्राथमिक तपासात आम्हाला असे आढळून आले की, यातील हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून वरती गेला आणि फायर एक्झिटमधून घरात शिरला. याबाबत संशयित हल्लेखोराची माहिती आम्ही काढली आहेत. या हल्लेखोराच्या शोधासाठी १० पथके मुंबईतील विविध भागात पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणातील हल्लेखोराला अटक केल्यानंतर बाकी सगळी माहिती देता येईल. परंतु, प्रथमदर्शनी तपासात हा हल्लेखोर चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात शिरला होता, असे समोर आले आहे, अशी महत्त्वाची पोलिसांकडून देण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
पोलिसांनी यासंदर्भातील सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो, हेदेखील पोलिसांनी सांगितले आहे. कुठून आले, ते सांगितले आहे. यावर पूर्ण कारवाई चाललेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, सिने विश्वातील सेलिब्रिटी, राजकारणातील मंडळी, नेते लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेत आहेत. सैफ अली खानच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सैफ अली खानची प्रकृती आता स्थित असून, उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास सैफ अली खान यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाकूच्या तुकड्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा तुकडा बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागली. त्यांच्या डाव्या हाताला दोन गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या मानेवरही जखम झाली होती. त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणि यातून बरे होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.