Join us

“बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत”; CM देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:28 IST

CM Devendra Fadnavis PC News: अलीकडेच भाजपा नेते सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

CM Devendra Fadnavis PC News: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू झालेला भाजपा आमदार सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

मला हरणाचे मांस खोक्याने पुरवले, असा आरोप करण्यात आला. आता माझ्यावर इतकी वाईट वेळ आली का? मूळात मी १६ वर्षे माळकरी राहिलो आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्याने मांसाहार करत असलो तरी हरणाचे मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलो नाही. पण इथे माझ्यावर हरणाचे मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकिटे काढून बिश्नोई समाजाची काही लोक आणले. याने हरणाचे मांस खाल्ले असे सांगून बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला होता. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत

अशा विधानांवर मी काही उत्तर देणार नाही. बीडमध्ये रोज नवीन विधाने केली जातात. पण माझ्याकरिता बीडचे प्रकरण महत्त्वाचे होते. त्यात सीआयडीने योग्य तपास केला. आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, याकडे आमचे लक्ष आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माझ्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जात असाल तर तुमच्यासोबत मैत्री काय कामाची आहे? मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. या कटात कोण-कोण सामील होते, याची माहिती माझ्याकडे आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसबीड सरपंच हत्या प्रकरणसंतोष देशमुख हत्या प्रकरणसुरेश धसभाजपा