Join us

"आम्ही सक्षम आहोत, कुठलीही वक्तव्ये करु नका"; CM देवेंद्र फडणवीसांचा निशिकांत दुबेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे यांना कोणतीही वक्तव्ये करु नयेत असा सल्ला दिला.

CM Devendra fadnavis on nishikant Dubey: मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना झालेली मारहाण यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य केले. आता पुन्हा निशिकांत दुबे यांनी मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान असल्याचे विधान केलं. यावरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे यांना महत्त्वाचा सल्ला दिला.

हिंदीच्या मुद्द्यावरुन निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं होतं. आता पुन्हा एकदा निशिकांत दुबेंनी मराठी भाषिकांना डिवचण्याचे काम केलं. उत्तर प्रदेश, बिहारी आणि हिंदी भाषिकांचं मुंबई बनवण्यात मोठे योगदान आहे. मुंबईतील लोकसंख्येत केवळ ३० टक्के मराठी भाषिक असल्याचं निशिकांत दुबे यांनी म्हटलं. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबेंच्या या विधानावर भाष्य केलं. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.

"निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्ये करु नयेत. इथली परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. इथले मराठी आणि अमराठी सुरक्षित आहेत. सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे नांदत आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाही. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मराठी आणि अमराठी लोकं निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला निशिकांत दुबेंना असा असेल की त्यांनी या विषयमध्ये कुठलेही वक्तव्य करु नये," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काय म्हणाले निशिकांत दुबे?

"मुंबई बनवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचे मोठे योगदान आहे. आजही जी अर्थव्यवस्था आहे त्यात आम्हीही योगदान देत आहोत. केवळ आम्हीच करतोय असं मी बोलत नाही. तुम्ही कोणत्या आधारे बोलता, केवळ ३० टक्के लोक मुंबईत मराठी बोलतात. १२ टक्के लोक उर्दू बोलतात. जवळपास ३० टक्केच हिंदी भाषिक आहेत. २ ते अडीच टक्के राजस्थानी बोलतात, कुणी गुजराती बोलतात, भोजपुरी बोलतात. त्यामुळे भाषेच्या आधारावर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. निवडणुकीसाठी भाषेचे राजकारण केले जाते मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णत: मुंबईतून संपून जाईल," असं निशिकांत दुबे यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरे