बुलेट ट्रेनच्या मार्गात मंजुरीचा खोडा; केवळ प्रकल्प अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 08:44 IST2022-02-15T08:43:55+5:302022-02-15T08:44:20+5:30
या सर्व मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून एकाही मार्गाला मंजुरी दिलेली नाही.

बुलेट ट्रेनच्या मार्गात मंजुरीचा खोडा; केवळ प्रकल्प अहवाल सादर
नारायण जाधव
ठाणे : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला सादर होणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली असली तरी या मार्गाला अद्याप रेल्वेची मंजुरी मिळालेली नाही. केवळ हाच मार्ग नव्हे तर मुंबई-हैदराबादसह देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या इतर सात प्रस्तावित मार्गांना रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गातील अडथळे आणि झालेली टीका पाहता रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेन मार्गांबाबत आस्ते कदम धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार देशात दिल्ली-वाराणसी, मुंबई-नागपूर, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगळुरू-मैसूर, वाराणसी-हावडा आणि दिल्ली-अमृतसर असे सात बुलेट ट्रेन मार्ग प्रस्तावित आहेत. परंतु, या सर्व मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून एकाही मार्गाला मंजुरी दिलेली नाही. मुंबई-नाशिक-नागपूर हा मार्ग सध्या ७४१ मार्गांचा प्रस्तावित आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोठी जमीन होणार बाधीत
ठाण्यातील म्हातार्डी, बेतावडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख) या गावांची जमीन जाणार आहे. तर तर मुंबई-नागपूर मार्गात नाशिकच्या पुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून ती न्यावी की नाही, यावरून राज्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांत मतभेद आहे. या गावांव्यतिरिक्त कल्याणपुढील नाशिकपर्यंतची अनेक गावांची जमीन मुंबई-नागपूर मार्गात बाधीत होणार आहे.
हे आहेत अडथळे
मोठ्याप्रमाणात शेतजमीनीसह वन जमीन बाधीत होणार आहे. त्यामुळे डीपीआरनंतर रेल्वमंत्रालयाने मंजुरी दिली तर सीआरझेड आणि वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आणि भूसंपादनाचे अडथळे पार करावे लागणार आहेत.
देशातील या आहेत सात बुलेट ट्रेन
दिल्ली-वाराणसी (८६५ किमी)
मुंबई-नागपूर (७५३ किमी)
दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी)
चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी)
दिल्ली-अमृतसर (४५९ किमी)
मुंबई-हैदराबाद (७११ किमी)
वाराणसी-हावडा (७६० किमी)