Join us  

#साफ श्वास २४ तास; स्वच्छ हवेसाठी अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:26 PM

स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकांचा मुलभूत अधिकार

मुंबई : वायू प्रदूषणाच्या धोक्याला ओळखून योग्य ती पाऊले उचलावी लागतील. जर यावर वेळीच उपाय केले गेले नाही तर येणाऱ्या पिढीला स्वच्छ श्वास घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. येणा-या पिढीच्या भविष्यासाठी स्वच्छ हवेचा वसा आपल्याला जपून ठेवावा लागेल, असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त भारत गणेशपुरे यांनी वातावरण फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी सवांद साधला. यावेळी ते बोलत होते. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वातावरण फाउंडेशनद्वारे स्वच्छ हवेसाठी चालवल्या जाणाऱ्या  #साफ श्वास २४ तास या अभियानाला गणेशपुरे यांनी पाठींबा दर्शवला आहे.जागतिक आरोग्य संघटनेकडील माहितीनुसार, जगभरात दर वर्षी वायू प्रदूषणामुळे ७० लाख लोक मृत्यू पावतात. आणि लँन्सेंट हेंल्थ जर्नल नुसार महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडतात. येणाऱ्या काळात हे संकट अधिकच गंभीर होईल याची शक्यता नाकारता येत नाही. वायू प्रदूषण आणि तापमान वाढ हे आजच्या काळातील जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तापमान वाढीत वायू प्रदूषण हे भर घालते. जगभरात सर्वाधिक प्रदूषित असणारे शहर हे भारतात आहे. ही बाब नक्कीच भूषणावह नाही. नॉन-अटेनमेंट म्हणजेच राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकांची लक्ष्ये न गाठता येणाऱ्या शहरांची संख्या भारतात १०२ इतकी आहे. हवा प्रदूषणामध्ये देशभरात महाराष्ट्र हे आपले राज्य अव्वल स्थानी आहे.  एकट्या महाराष्ट्रात १८ शहरे ही पर्यावरणीय आरोग्याच्या बाबतीत व्हेंटीलेटरवर आहेत. तज्ञांच्या मते वायू प्रदूषणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर सर्वाधिक गंभीर दुष्परिणाम होत असतो. याची पुनरावृत्ती भविष्यात टाळायची असले तर, हरित ठिकाणांचे संवर्धन आणि प्रदूषणावर नियंत्रण हा मूलमंत्र सर्वांनी अंगिकारला पाहिजे.

 

टॅग्स :पर्यावरणमुंबईसरकारहवामान