मिठी नदीची होणार स्वच्छता; मुंबई पालिकेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:57 AM2019-07-26T00:57:33+5:302019-07-26T00:57:58+5:30

चार टप्प्यांमध्ये काम, स्विडीश कंपनीला सल्ल्यासाठी देणार सुमारे २२ कोटी रुपये

Cleanliness of the river Mithi; | मिठी नदीची होणार स्वच्छता; मुंबई पालिकेची माहिती

मिठी नदीची होणार स्वच्छता; मुंबई पालिकेची माहिती

googlenewsNext

मुंबई : मिठी नदीचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे महापालिका प्रशासनाने ठरवले आहे. नदीतील मलमिश्रित पाणी शुद्ध करून नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प आखण्यात येणार आहे. मिठी नदी स्वच्छतेसाठी चार टप्प्यांमध्ये काम करण्यात येणार आहे. यासाठी एका स्विडीश कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये (नॅशनल पार्क) उगम पावून अंधेरी सीप्झ, मरोळ, अंधेरी येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीखालून जात बैल बाजार, कुर्ला-वांद्रे संकुल (बीकेसी) या क्षेत्रातून वळण घेत मिठी नदी माहिम येथील अरबी समुद्राला जाऊन मिळते. नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदी पात्रानजीकचे रहिवासी, औद्योगिक परिसर आणि नाल्यांमधून हजारो दशलक्ष लीटर सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जाते. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या प्रलंयकारी पावसामध्ये मिठी नदीने रौद्र रूप दाखवले होते. त्यानंतर मिठी नदीच्या पात्रात झालेली अतिक्रमणे दूर करण्यासाठी तसेच नदी स्वच्छतेचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला.

गेल्या १० वर्षांहून अधिक काळ नदी पात्राचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी पालिकेने फ्रिश्मॅन प्रभू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सल्लागाराने नदीचे सर्वेक्षण आणि अभ्यास केल्यानंतर चार टप्प्यांमध्ये उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार मिठी नदीमध्ये येणारा मल प्रवाह वळविण्यासाठी नदीलगत प्रवाहरोधक बांधणे, मलवाहिन्या टाकणे, मलजल उदंचन केंद्र व मल प्रक्रिया केंद्र उभारणे, मिठी नदी सर्व्हिस रोड बांधणे ही कामे करावी लागणार आहेत. या चार टप्प्यांच्या कामांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून आय.व्ही.एल. स्विडिश एन्व्हायरॉन्मेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला सल्ल्यासाठी २१ कोटी ९० लाख रुपये दिले जाणार आहेत.

अंधेरी-कुर्ला मार्गावर उत्तरेकडे जाताना पश्चिम दिशेहून मिठी नदी वाहते. आता या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. या नदीवरील बैल बाजाराजवळील पूल ओलांडला की सखल भागात क्रांतीनगर वस्ती आहे. या वस्तीतील मलनिस्सारण वाहिन्या मिठी नदीला जोडल्या आहेत. पावसाळ्यात नदीची पातळी वाढते. विहार तलावदेखील तुडुंब भरत असल्याने पवईकडील पाणी तेथून नदीत येते. त्याचवेळी पश्चिमेकडे समुद्राची भरतीदेखील नदीचे पाणी मागे फेकते. पवई व समुद्राची भरती या दोन्हीकडील दबावाचा नदीवर भार येऊन या भागात नदीचे पात्र फुगते. त्यातून हा भाग सखल असल्याने नदीचे पाणी तर येथे येतेच; शिवाय मलनिस्सारणाचे पाणीही जाळीदार वाहिन्यांमधून पुन्हा उलटे वस्तीत येते.

नदी तीरावरील या वस्त्यांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आजवर झालेल्याच नाहीत. पण आता त्यांच्या पुनर्वसनाचा घाट घातला आहे. क्रांतीनगरवासीयांचे पुनर्वसन कमानी येथे करण्याची घोषणा स्वत: मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता रहिवाशांना त्याची प्रतीक्षा आहे.

आपत्कालीन परिस्थिती अन् यंत्रणा
२६ जुलै २००५ रोजीच्या महापुरापूर्वी सर्वच नियंत्रण कक्ष अथवा प्राधिकरणे एकमेकांशी समन्वय साधत नव्हती असे नाही, तर तेव्हा समन्वयाचे कामकाज धिम्या गतीने होत होते; किंवा त्या तुलनेत समन्वय साधला जात नव्हता. मात्र मुंबईला २६ जुलैचा फटका बसला आणि सर्वच यंत्रणा सजग झाल्या. सर्वप्रथम मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग अद्ययावत करण्यात आला.

२६ जुलैनंतर आपत्कालीन घटनेदरम्यान मुंबई महापालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, तटरक्षक दल, नौदल, विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई प्रादेशिक हवामान शास्र विभागासह मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच यंत्रणा आपत्कालीन प्रसंगादरम्यान एकमेकांशी संपर्कात असतात. केवळ आपत्कालीन प्रसंग नव्हेतर जेव्हा जेव्हा मुंबईवर आपत्ती ओढवते तेव्हा तेव्हा या सर्व यंत्रणा समन्वय साधत मदत कार्याचे काम वेगाने करीत असतात.

विशेषत: पावसाळ्यात हवामान खाते, महापालिका, विमानतळ प्राधिकरण, अग्निशमन दल, पोलीस आणि रेल्वे ही सहा प्राधिकरणे अधिक सक्षम वेगाने काम करतात. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुंबई महापालिका, रेल्वे, तटरक्षक दल आणि विमानतळ प्राधिकरण ही प्राधिकरणे आपत्कालीन घटनांना तोंड देण्यासाठी कायम सज्ज असतात.

Web Title: Cleanliness of the river Mithi;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.