मुंबईत मूर्तिकारांच्या बैठकीत राडा; पीओपी समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:53 IST2025-04-26T05:53:04+5:302025-04-26T05:53:35+5:30

बैठकीनंतर खाली रस्त्यावर काही ‘पीओपी’ समर्थकांनी मला मारहाण केली, असा आरोप पीओपी विरोधक वसंत राजे यांनी केला

Clashes at sculptors' meeting in Mumbai; POP supporters and opponents clash | मुंबईत मूर्तिकारांच्या बैठकीत राडा; पीओपी समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले

मुंबईत मूर्तिकारांच्या बैठकीत राडा; पीओपी समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले

मुंबई - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परळ ‘एफ-दक्षिण’ विभागात आयोजित मूर्तिकारांच्या बैठकीत राडा झाला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीस विरोध करणारे आणि पीओपीचे समर्थन करणारे मूर्तिकार यांच्या शाब्दिक चकमक झाली.

हे प्रकरण इतक्यावर न थांबता खुर्च्या आणि माईकची फेकाफेकी झाली. बैठकीनंतर खाली रस्त्यावर काही ‘पीओपी’ समर्थकांनी मला मारहाण केली, असा आरोप पीओपी विरोधक वसंत राजे यांनी केला. अखेर हा वाद भोईवाडा पोलिस ठाण्यात पोहोचला. पीओपीवरून मूर्तिकारांमध्ये दोन गट पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखून पीओपीचा वापर टाळावा, असे पीओपी विरोधकांचे म्हणणे आहे. तर उंच पर्यावरणपूरक मूर्ती बनवता येत नाहीत, त्या टिकत नाहीत तसेच पीओपी मूर्तीच्या व्यवसायात हजारो जणांचे संसार अवलंबून आहेत, पीओपी बंदीमुळे अनेक कुटुंबे बेरोजगार होतील, असा पीओपी समर्थकांचा दावा आहे. 

एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या
बैठकीतही दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी आपापले मुद्दे रेटले. त्यातून मग शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गट आक्रमक झाले आणि वाद आणखीनच पेटला. काहीजण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या एकमेकांच्या अंगावर फेकल्या. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण आटोक्यात आले. बैठकीनंतर सगळे खाली आल्यानंतर पुन्हा वादावादी सुरू झाली. काही पीओपी समर्थक माझ्या अंगावर धावून आले, मला मारहाण केली, असा आरोप राजे यांनी केला. 

या प्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या प्रकरणी पालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, बैठकीत किरकोळ वादावादी झाली. पण, त्यानंतर बैठक सुरळीत पार पडली. बैठक आटोपल्यानंतर खाली काय घडेल याची कल्पना नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Clashes at sculptors' meeting in Mumbai; POP supporters and opponents clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई