Join us  

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की?; प्रश्न विचारताच मुख्यमंत्री चिडले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 3:07 PM

महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाल्यानंतर दोघे एकमेकांवर धावून गेल्याचं सांगितलं जात आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी सुरू असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री एकमेकांना भिडल्याची माहिती समोर आली. शिवसेनेचे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाल्यानंतर दोघे एकमेकांवर धावून गेल्याचं सांगितलं जात आहे. या वादानंतर स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना समजावलं. या सगळ्या प्रकाराबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुख्यमंत्री काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.

आमदार आणि मंत्र्यांमध्ये नेमका काय वाद झाला? असा प्रश्न पत्रकारांकडून मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाराज होत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "काही तर काय विचारताय...अधिवेशनाबद्दल प्रश्न विचारा," असं म्हणत मुख्यमंत्री तिथून निघून गेले. 

वादानंतर महेंद्र थोरवे काय म्हणाले?

सभागृह परिसरात झालेल्या या वादानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांसमोर येत मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहोत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडून देत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री असलेले दादा भुसे यांच्या खात्यातील एका कामाचा पाठपुरावा माझ्यासह भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. दादा भुसे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कॉल करुन सांगितलं होतं की, ते काम करुन घ्या. परंतु दादा भुसेंनी अजूनपर्यंत काम केलं नाही. त्यामुळे आज त्यांना मी भेटलो आणि विचारलं की दादा बाकीच्या लोकांची कामं तुम्ही बैठकीत घेतली. परंतु माझ्यासह मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं काम तुम्ही केलं नाही. त्यानंतर ते माझ्यासोबत चिडून बोलायला लागले. मी म्हटलं आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. मग मंत्र्यांकडून अशी उत्तरं आम्ही का ऐकून घ्यायची. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी काय तुमच्या घरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जनतेचं काम आहे, माझ्या मतदारसंघातील काम आहे. मात्र दादा भुसे यांची बोलण्याची पद्धन थोडी वेगळी होती," असा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

दरम्यान, आमदार महेंद्र थोरवेंसोबत माझी बाचाबाची झाल्याच्या वृत्ताचं मी खंडन करतो, असं सभागृहाला या प्रकाराची माहिती देताना दादा भुसे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र बजेट 2024