फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची
By सीमा महांगडे | Updated: April 13, 2026 14:28 IST2026-04-13T14:28:32+5:302026-04-13T14:28:54+5:30
Mumbai News: मुंबईतील रेल्वेस्थानकांचा परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून, महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी अल्पावधीतच त्यांनी आपला धंदा पुन्हा थाटला असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे.

फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची
- सीमा महांगडे
मुंबई - मुंबईतील रेल्वेस्थानकांचा परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून, महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी अल्पावधीतच त्यांनी आपला धंदा पुन्हा थाटला असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. महापालिकेकडून फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई केल्याचा दावा करण्यात येत असून, गेल्या वर्षभरात एक लाख ६६ हजार ६०९ फेरीवाल्यांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे. खाऊ गल्ल्यांमधील चायनीजसह अन्य खाद्यपदार्थांच्या गाड्या, अवैध सिलिंडर, भाजी-फळे आणि अन्य विक्रेत्यांवर वर्षभरात ७३ कोटींच्या दंडवसुलीच्या नोटिसा (इस्टीमेटेड) दिल्या आहेत, मात्र केवळ एक कोटी रुपये दंड वसूल झाला आहे.
मुंबईत लाखभराहून अधिक फेरीवाले व विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला आणि पदपथावर गाड्या व स्टॉल्स थाटले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. रस्ते किंवा पदपथावरून चालणेही मुश्कील झाल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.
बेकायदा फेरीवाले व विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारले आहे. त्यामुळे पालिकेने बेकायदा फेरीवाले व विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे. काही ठिकाणी या कारवाईचा परिणाम थोडा काळ दिसत असला तरी पुन्हा फेरीवाले व विक्रेते ठाण मांडून आहेत.
काही भागांमध्ये पुन्हा रस्त्यावर पथारी
पालिकेने अनधिकृत फेरीवाले व विक्रेत्यांवर कारवाई करताना दंड आकारणी बरोबरच त्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
आर्थिक फटका न बसल्याने हे फेरीवाले पुन्हा बस्तान मांडून बसत असल्याचे मत नगरसेवक व्यक्त करत आहेत.
२५ हजार जणांवर बडगा
यंदाच्या वर्षात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पालिकेकडून शहरातील २५ हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली असून १६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.