लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेने माहीम न्यू रोड एम. एम. छोटानी शाळेची इमारत पाडू नये, अशी मागणी करत पालक आणि स्थानिक नागरिक शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाऊ नये, यासाठी एकवटले आहेत. दरम्यान, या शाळेची इमारत धोकादायक जाहीर केल्याचे पालिकेने म्हटले आहे.
माहीम पश्चिमेला रेल्वे स्थानकालगत न्यू माहीम रोड एम. एम. छोटानी ही पालिका शाळा आहे. या शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी २०१७-१८ मध्ये झाली. याच परिसरातील पालिकेच्या मोरी रोड माहीम शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. ती अद्याप पुन्हा बांधण्यात आलेली नाही. त्याचा फटका विद्यार्थी व पालकांना बसला आहे. त्यामुळेच न्यू माहीम रोड शाळेची इमारत तोडू नये, या मागणीचे सह्यांचे निवेदन पालकांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहे, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रणाली राऊत यांनी दिली आहे.
पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ३ जानेवारी २०२५च्या पत्रात म्हटले आहे, की शाळेच्या इमारती संबंधी मेसर्स पेंटॅकल कन्सल्टंट इंडिया प्रा. लि. यांची इमारती प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. शाळा इमारतीचे त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. १८ डिसेंबर २०२४ रोजी शाळेची इमारत सी-१ धोकादायक श्रेणी म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘दोनच वर्षांपूर्वी नूतनीकरण’माहीममधीलच न्यू माहीम रोड पालिका शाळेचे दोन वर्षांपूर्वीच नूतनीकरण पालिकेने केले आहे. त्यामुळे शाळा अत्यंत व्यवस्थित आहे. शाळेत प्रवेश केल्यास ते जाणवते. परिणामी, ही शाळा बंद करू नये, असे पालक गुरुनाथ मांजरेकर यांनी सांगितले आहे.
न्यू माहीम रोड शाळेच्या ठिकाणी पुन्हा नवीन शाळाच बांधली जाईल, असे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच आयुक्तांना भेटणार आहोत. महेश सावंत, आमदार, उद्धवसेना
महापालिकेने या आधी तीन वर्षांपूर्वी मोरी रोड शाळा पुनर्बांधणीच्या नावाखाली पाडली. पुन्हा तिथे शाळा बांधली नाही. येथे शाळा बांधण्यात येणार आहे का, हे पालिकेने आधी जाहीर करावे.दिवाकर पारकर, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते
न्यू माहीम रोड छोटानी पालिका शाळेची इमारत तोडू नये. ही शाळा इमारत तोडण्याइतपत धोकादायक नाही.सुधीर पेडणेकर, स्थानिक नागरिक