नागरिकांनो, 'पोलीस डिजिटल अरेस्ट' करत नाहीत! सायबर भामट्यांच्या नव्या जाळ्यापासून राहा सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:15 IST2026-03-09T14:15:03+5:302026-03-09T14:15:35+5:30
आभासी अटक आणि त्यानिमित्ताने कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मुंबई पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे.

नागरिकांनो, 'पोलीस डिजिटल अरेस्ट' करत नाहीत! सायबर भामट्यांच्या नव्या जाळ्यापासून राहा सावध
मुंबई : पोलिसांकडून डिजिटल अरेस्ट कधीच करण्यात येत नाही. अशा प्रकारच्या कारवाईसाठी कायद्यात तरतूद नाही. ऑनलाइन लुटण्यासाठी भामट्यांकडून शक्कल लढवली जात आहे. त्यामुळे असे कॉल आल्यास घाबरू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
आभासी अटक आणि त्यानिमित्ताने कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मुंबई पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरतात. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी पश्चिम उपनगरात एकटे राहणाऱ्या वृद्धांचे घर गाठून आभासी
अटकेची कार्यपद्धती आणि फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. सायबर पोलिसांनी उत्तर मुंबईपासून मोहीम सुरू केली असून, ५६३ ज्येष्ठ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
पाच प्रादेशिक सायबर पोलिस ठाणे, आठ पोलिस अधिकारी व ३६ अंमलदार मोहिमेत सहभागी झाले. जनजागृतीसाठी माहितीपत्रके वाटप केली गेली.
अशा प्रकारे गुन्हेगार अडकवतात जाळ्यात
सायबर गुन्हेगार पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून जेष्ठ नागरिकांना मोबाइल फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करतात. मनीलॉन्ड्रिंग, ड्रग्स तस्करी किंवा अन्य गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून आर्थिक लुबाडणूक करतात. यासाठी ते पोलिस, न्यायालये किंवा इतर तपास यंत्रणांचे नाव वापरतात.
ज्येष्ठ नागरिकांना आवाहन :
१. अनोळखी व्यक्तीकडून येणारे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका आणि पैशांची देवाणघेवाण करू नका.
२. कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात किंवा स्वभावात बदल दिसल्यास तत्काळ लक्ष द्या.
३. फसवणुकीची घटना घडल्यास कुटुंबीय आणि नातेवाइकांना त्वरित माहिती द्या.
४. डिजिटल अटकेबद्दल कॉल आल्यास लगेच जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा किंवा १००/१९३० या हेल्पलाइनवर फोन करा तसेच तक्रार www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर नोंदवता येईल.