Citizens' objections and opinions invited under Swachh Bharat Abhiyan | स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागविले नागरिकांचे आक्षेप व अभिप्राय

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागविले नागरिकांचे आक्षेप व अभिप्राय


मुंबई : केंद्र सरकारच्‍या ‘गृहनिर्माण व नागरी व्‍यवहार’ खात्‍याने ‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत आखून दिलेल्‍या मुद्यांनुसार मुंबई महानगरपालिका स्‍वच्‍छ सर्वेक्षणामध्‍ये सहभाग घेत आहे. शहरांना शौचालयाची योग्‍य ती स्थिती आणि‍ देखभाल ठेऊन ‘हगणदारीमुक्‍त ++’ चे ध्‍येय गाठता येतील, अशा प्रकारचे निकष बनवले गेले आहेत. त्‍यासंबंधीची तपशीलवारसह माहिती ‘स्‍वच्‍छ भारत अर्बन’ या केंद्र शासनाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

यावर्षी, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने स्‍वच्‍छतेसाठी पायाभूत सुविधा, माहिती-शि‍क्षण-संवाद अंतर्गत कार्यक्रम, क्षमता बांधणी अशा सर्व स्‍तरावर काम केले आहे. मुंबईमध्ये अद्यापपर्यंत ७ हजार २१२ शौचालयांमध्ये ८७ हजार ४२२ शौचकुपे वापरात आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मुंबई शहर ‘हगणदारीमुक्‍त ++’ करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वस्‍ती स्‍वच्‍छता कार्यक्रम विभागामार्फत ‘कंत्राट लॉट – ११ (आर)’ अंतर्गत स्वतःच्या हद्दीतील एकूण १ हजार १६८ सामुदायिक शौचालयांमध्ये २२ हजार ७७४ शौचकुपे बांधणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १३९ सामुदायिक शौचालयांमध्ये २ हजार ८२० शौचकुपे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच ५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३ हजार ९९८ शौचकुपे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सदर शौचकुपांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तांत्रिक तपशीलानुसार करण्यात येत आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका ‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत असणा-या निकषांच्‍या अधीन राहून ‘हगणदारीमुक्‍त ++’ साठी नागरिकांना विनंती करण्‍यात येत आहे की, याबाबत काही आक्षेप अथवा सूचना असल्‍यास त्‍यांनी greenmumbai.report@gmail.com या ई-मेल पत्त्यावर १४ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी कळवाव्‍यात, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Citizens' objections and opinions invited under Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.