Join us

चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:01 IST

आग लागलेले केकचे दुकान हे आयआरसीटीसीचे होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील एका केक शॉपला पेस्ट्री स्टोरेज फ्रीजमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे गुरुवारी आग लागली होती. याप्रकरणी आता पश्चिम रेल्वेने आगीचे कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), पश्चिम रेल्वेचा ऑपरेटिंग, कमर्शियल, इलेक्ट्रिकल विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) यांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवरील सर्व दुकानांची तपासणी केली जाणार आहे.  येत्या काळात काही धोरणात्मक बदल करण्याचाही रेल्वेचा विचार आहे.

दुकान आयआरसीटीसीचे!

आग लागलेले केकचे दुकान हे आयआरसीटीसीचे होते. अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर रात्री फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली होती. सध्या त्या दुकानावर निळ्या रंगाची ताडपत्री टाकली आहे. व्यावसायिक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या तपासात शॉर्टसर्किटचे मुख्य कारण उंदरांनी वायर कुरतडणे, विजेचा ओव्हरलोड, वायरमधील तांत्रिक समस्या असू शकते, असा अंदाज आहे.  

१० दिवसांची मोहीम

रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विद्युत उपकरणांची पुढील दहा दिवस तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व उपकरणांमध्ये इलेक्ट्रिकल लिकेज सर्किट ब्रेकर बसविण्यात येईल. जंक्शन बॉक्समध्ये मिनिएचर सर्किट ब्रेकर बसवण्यात येणार आहे तसेच तापमान नियंत्रित करण्यासाठी इंडक्शन आणि एअर फ्रायरमध्ये थर्मोस्टॅट स्वीच अनिवार्य करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :आगमुंबई लोकल