Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकले शाळांमध्ये, पण कॉलेजकुमार घरीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:11 IST

महाविद्यालयांना मुहूर्त कधी? : विद्यार्थी-पालकांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  मुंबईत आणि राज्यात अनेक ठिकाणी पहिली ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या असून, चिमुकली मुले शाळांमध्ये जाऊ लागली आहेत. मात्र, महाविद्यालयांतील कॉलेजकुमार अजूनही घरीच बसून महाविद्यालय ऑफलाईन कधी सुरु होणार याच्या प्रतीक्षेत आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला असल्याची माहिती दिली असली तरी सरकारने लवकरात लवकर यासंदर्भातील निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होऊ लागली आहे. लस न घेतलेली शाळकरी मुले वर्गांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत, तर लसीकरण झालेले विद्यार्थी मात्र ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

जानेवारीच्या सुरुवातीला मुंबई आणि राज्यातील ओमायक्रॉन व कोरोनाची वेगाने वाढती रुग्णसंख्या पाहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू राहील व परीक्षाही ऑनलाईनच होतील, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील सरसकट शाळा बंदचा निर्णयही सरकारने घेतला. मात्र, त्यानंतर बंद झालेल्या पहिली ते बारावीच्या शाळा, शिवाय पूर्व प्राथमिकचे वर्गही सोमवारपासून पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र, राज्यातील पदवी महाविद्यालये आणि विद्यापीठे प्रत्यक्ष सुरु करण्याचा निर्णय अद्याप न घेतल्याने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व प्राचार्यांसह सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मिशन युवा स्वास्थ्याचा दुसरा टप्पा लवकरच राज्यात सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी हाती घेण्यात आलेला उपक्रम मिशन युवा स्वास्थ्याचा दुसरा टप्पाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे, त्यांचा दुसऱ्या डोससाठीचा आवश्यक कालावधी आता पूर्ण होत आला असल्याने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना अद्याप काही ना काही कारणाने लसीकरणात सहभागी होता आले नाही, त्यांना त्यांच्या महाविद्यालयातच लस दिली जाणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाविद्यालयमहाराष्ट्र