Join us

वडिलांकडून चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 03:05 IST

चेंबूर परिसरात ६ वर्षांची चिमुकली आई-वडिलांसोबत राहते

मुंबई : जन्मदात्या वडिलांकडून गेल्या सहा महिन्यांपासून ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचारासह अनैसर्गिक अत्याचार सुरू असल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली. रविवारी आईनेच रंगेहाथ पकडल्याने हा प्रकार समोर आला. त्यानुसार, आरसीएफ पोलीस ठाण्यात पॉक्सो, लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत ४० वर्षीय वडिलांना अटक करण्यात आली आहे.

चेंबूर परिसरात ६ वर्षांची चिमुकली आई-वडिलांसोबत राहते. तर पीडित मुलीचे वडील सफाई कामगार आहेत. आई बाजारात अथवा अन्य कामासाठी बाहेर जाताच तो मुलीवर अत्याचार करीत असे. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे भीतीने मुलीने याबाबत कुणालाच काही सांगितले नाही. अनेकदा ती आईसोबत जात असे. मात्र कामानिमित्त ती घरात एकटी राहताच वडील तिला लक्ष्य करत असे.

रविवारी आई भाजी आणण्यासाठी बाहेर जाताच त्याने घरात एकट्या असलेल्या मुलीवर अत्याचार केले. त्याचे विकृत चाळे सुरू असतानाच तिची आई अचानक घरी आली. सुरू असलेला प्रकार पाहून तिला धक्का बसला. तिने मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. तेव्हा, गेल्या सहा महिन्यांपासून ती रोज वडिलांच्या विकृतीची शिकार होत असून तिनेच वरील घटनाक्रमाला वाचा फोडली. त्यानुसार, आईने मुलीसह थेट आरसीएफ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.अटकेनंतरही तो आईनेच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. वैद्यकीय तपासणीत मुलीवर लैंगिक तसेच अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे प्रकरण लवकर उघडकीस आले नसते तर मुलीच्या जीवाला धोका होता, असेही डॉक्टरांकडून पोलिसांना सांगण्यात आले. या प्रकारामुळे मुलगी मानसिक धक्क्यात आहे. आरोपीच्या अटकेच्या वृत्ताला आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमुंबई