Join us

भाडेकपातीमुळे ‘बेस्ट’ प्रशासनाकडे वाढली चिल्लर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 04:09 IST

व्यापारी, दुकानदारांना मिळणार सुट्टे पैसे

मुंबई : सुट्ट्या पैशांसाठी एकेकाळी प्रवासी आणि बेस्ट वाहकांमध्ये खटके उडत होते. भाडेकपातीमुळे आता हीच चिल्लर बेस्टसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागली आहे. दररोज प्रवाशांकडून मिळणाऱ्या दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागली आहेत. त्यामुळे व्यापारी, दुकानदार अथवा नागरिकांना नोटांच्या बदल्यात ही चिल्लर देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.बेस्ट उपक्रमाने जुलै महिन्यापासून प्रवासी भाड्यात कपात करून किमान पाच ते २० रुपये भाडे ठेवले आहे. यामुळे दररोज ११ ते १२ लाखांची नुसती चिल्लरच जमा होत असल्याने ती मोजणे तितकेच अवघड झाले आहे. बेस्टच्या ताफ्यात ३,३३७ बसगाड्या असून ३३ लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. प्रवासी संख्या वाढल्यामुळे चिल्लरचे प्रमाणही वाढले आहे.त्यामुळे १० व २० रुपयांच्या नोटा, १० रुपये, ५ रुपये २ व १ रुपयांची जमा झालेली नाणी नागरिक , व्यापारीवर्ग व अन्य कोणास हवे असल्यास नोटांच्या बदल्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस आगारांमध्ये तिकीट व रोख विभागात (रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून) सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था केल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.रिडलर अ‍ॅपचा बेस्ट दिलासा...बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवेचा लाभ घेतल्यास प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, त्यांना होणारा त्रास कमी होईल, असा दावा बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तेसच या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी प्रवाशांना केले आहे.बेस्ट उपक्रमाच्या रिडलर अ‍ॅपमुळे प्रवाशांना मोबाइलवरून तिकीट घेता येणार आहे. तसेच बसपास काढणे व त्याचे नूतनीकरण करणेही आता शक्य झाले आहे. ही सुविधा प्रवाशांसाठी वेळ वाचवणारी आहे. ई-वॉलेटचाही वापर करून प्रवाशांनी आपली गैरसोय दूर करावी, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

टॅग्स :बेस्ट