मोबाइलच्या हव्यासामुळे मुलांनी गमावले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:50 IST2025-06-12T13:50:03+5:302025-06-12T13:50:14+5:30

Mumbai News: लहान बालकांपासून शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइल आणि त्यातील विश्वाची भुरळ पडलेली आहे. मुलांना मोबाइलपासून दूर करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा त्यांच्या जीवावरही बेतू शकतो.

Children lost their lives due to the desire for mobile phones | मोबाइलच्या हव्यासामुळे मुलांनी गमावले आयुष्य

मोबाइलच्या हव्यासामुळे मुलांनी गमावले आयुष्य

मुंबई -  लहान बालकांपासून शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइल आणि त्यातील विश्वाची भुरळ पडलेली आहे. मुलांना मोबाइलपासून दूर करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. गोरेगावच्या आरे परिसरातील १४ वर्षाच्या मुलीने ९ जूनला गळफास घेत आयुष्य संपवले. पालकांनी तिला मोबाइलवर गेम खेळण्यास मनाई केल्याच्या रागात तिने हे पाऊल उचलल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

स्क्रीनच्या वेळेची मर्यादा निश्चित करा आणि मुलांना शारीरिक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. मुले बऱ्याचदा सायबर बुलिंग किंवा सोशल मीडिया किंवा पॉर्न साइटवरून येणाऱ्या धमक्यांचे टार्गेट बनू शकतात. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेल्या पॅरेंटल ॲप्सचा वापर करा. मुलांशी सतत संवाद साधणे हे या काळात अत्यंत गरजेची बाब आहे.

मुलांचा एकटेपणाही मोबाइलच्या अतिरिक्त वापराला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आजी-आजोबा किंवा नातेवाईक आणि कुटुंबीयांसोबत भेटीगाठी वाढवल्यास मुलांना एकटेपणा घालवण्यास मदत होऊ शकते. 

यापूर्वीच्या घडलेल्या काही घटना...
- सतत मोबाइलच्या वापरावरून पालक ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलीने उंदीर मारण्याचे विष प्राशन केल्याची घटना अंबरनाथमध्ये २६ सप्टेंबर २०२२ रोजी घडली होती. २ ऑक्टोबर रोजी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.
- दिंडोशी पोलिसांच्या हद्दीत ९ जून २०२२ रोजी १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने लोकल समोर उडी मारून आयुष्य संपवले. या प्रकरणातही मोबाइलवर गेम खेळण्यावरून त्याची आई त्याला रागावली होती, असे तपासात उघड झाले. 
- सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्या १५ वर्षीय मुलीकडून तिचा फोन पालकांनी हिसकावून घेतला. त्या रागात तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना मालवणी पोलिसांच्या हद्दीत २२ एप्रिल २०२३ रोजी घडली होती.

अतिवापराचे दुष्परिणाम 
दृष्टी अंधूक, डोकेदुखी : दीर्घकाळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे दृष्टी अंधूक होऊ शकते आणि डोकेदुखी होऊ शकते. 
लठ्ठपणा, आरोग्य समस्या : एकाच जागी बसून राहण्याची जीवनशैली निर्माण होऊन शारीरिक हालचाली कमी होतात. लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
रेडिएशन एक्सपोजर : मुलांचे मेंदू प्रौढांपेक्षा जास्त रेडिएशन शोषून घेतात. त्यामुळे अशा मुलांमध्ये विशिष्ट प्रकारचा कर्करोग बळावण्याची शक्यता आहे.

Web Title: Children lost their lives due to the desire for mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.