ब्ल्यू व्हेलवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन- आ. डॉ. नीलम गो-हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 16:49 IST2017-08-01T16:40:01+5:302017-08-01T16:49:59+5:30
ऑनलाइन गेमबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करण्याकरिता आज आ. डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली.

ब्ल्यू व्हेलवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन- आ. डॉ. नीलम गो-हे
मुंबई, दि. 1 - लहान मुलांच्या जीवाशी खेळणा-या ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेमबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करण्याकरिता आज आ. डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली. याबाबत त्यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत यावर कार्यवाही करण्याचे मान्य केले. 31 जुलै, 2017 रोजी अंधेरीतील मनप्रीतसिंग या 14 वर्षीय मुलाने ब्ल्यू व्हेलच्या अॅडमिनिस्ट्रेटरचा आदेश ऐकला आणि टेरेसवरून उडी टाकून आत्महत्या केलेली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. या खेळामुळे देशातील ब्ल्यू व्हेलचा पहिला बळी गेलेला आहे. 12 ते 16 वयोगटातील मुले हा गेम मोठ्या प्रमाणात खेळत असल्याचे आढळून आलेले आहे.
मुख्यतः हा गेम एकदा मोबाईलवर डाऊनलोड झाला की, तो पुन्हा अनइन्स्टॉल किंवा डिलीट करता येत आहे. या खेळ ऑनलाइन असून दररोज एक याप्रमाणे 50 दिवसांची विविध आव्हाने या खेळामध्ये दिली जातात. त्यामध्ये पहाटे 4.20ला उठणे, रात्रभर जागे रहाणे, केनवर चढणे, हातावर धारदार अवजारांनी कोरणे , दिवसभर हॉरर चित्रपट पाहणे असे विविध टास्क करावे लागतात. हा मोबाईल गेम मुलांच्या जिवाशी खेळ करित आहे. गेल्याच वर्षी पोकेमॉन या मोबाईलवरील गेम मुलाच्या जीवाशी खेळत होता. आणि आता हा ब्लू व्हेल हा गेम आल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या खेळामुळे रशियात आतापर्यंत 130 मुलांनी आत्महत्या केल्या असून, इंग्लंड, अमेरिका, इटलीमध्येही धुमाकूळ सुरू आहे. सगळ्या रशियाचा आणि त्याच्या शेजारील काही देशांचा ब्ल्यू व्हेल नावाच्या एका इंटरनेट गेमने काळजीने थरकाप उडवला आहे. ब्ल्यू व्हेल हा अशा प्रकारचा एकमेव खेळ नसून द सायलेंट हाऊस, द सी ऑफ व्हेल, वेक मी अप अॅट टू फोर्टी असेही विचित्र खेळ इंटरनेटवर खेळले जातात. सध्या मात्र या ब्ल्यू व्हेलने अनेक पालकांची झोप उडवली आहे. वाईट असं की, भारतातही या गेमनं काल एका 14 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला. तसं पाहायला गेलं तर रोज नवा गेम इंटरनेटवर येत असतो. मुलं सहज ते खेळायला लागतात. हे खेळ तसेही कुणी कुणाला शिकवत नाही. थेट खेळायला सुरू करूनच गेमचे नियम आत्मसात करत असतात.पण ब्ल्यू व्हेलने मात्र सार्यावर कडी केली. रशियात खळबळ माजवली.वरवर इतर गेम्ससारखे नाव असेलेल्या या खेळामुळे आतापर्यंत 130 मुलांचे प्राण गेले आहेत. काही ब्ल्यू व्हेल स्वतःचा अंतकाळ जवळ आला की आधीच किनार्याकडे जातात आणि जीवन संपवतात. या त्यांच्या पद्धतीवरून आत्महत्या घडवणार्या या खेळाचं नाव ब्ल्यू व्हेल पडलं.