Join us  

मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री रमले वर्गमित्रांसोबतच्या गप्पांत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:32 AM

बालमोहन विद्यामंदिरात रंगला ‘बालमोहन अभिमान’ सोहळा : नेहमीचा प्रोटोकॉल बाजूला सारत फोटोसेशनमध्ये दंग

मुंबई : दादरमधील प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिर शाळेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आपल्या शाळेतील मित्रांसोबत गप्पा मारण्यात रमून गेले. एरवीचा प्रोटोकॉल बाजूला सारत राज्याचे प्रमुख आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी शाळेच्या सभागृहात शालेय मित्रमैत्रिणींसोबत फोटोसेशनमध्ये दंग होते. ग्रुप फोटोची लगबग होती आणि काहींसोबत सेल्फीही झाले. निमित्त होते बालमोहनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे दोघेही बालमोहनचे माजी विद्यार्थी. उद्धव ठाकरे हे दहावी-ई १९७६ बॅचचे तर जयंत पाटील दहावी-ड १९७७ च्या बॅचचे विद्यार्थी. या आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी शाळेच्या सभागृहात ‘बालमोहन अभिमान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. १९७६ आणि ७७ बॅचचे विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, विश्वस्त, शिक्षक आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त गुरुप्रसाद रेगे यांच्या हस्ते रोपटे, शाल, देवी सरस्वतीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. बालमोहनमधील संस्कारांनीच जीवनाला पैलू पाडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शाळेतील संस्कार उपयोगी पडतात. चांगले आणि वाईट याचा फरक याच संस्कारांमुळे कळला. काय केले पाहिजे आणि काय नाही, याची निवड करण्याची समज शाळेने दिल्याचे पाटील यांनी सांगितले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्वीकारत होते तेव्हा अनेक जण त्यांना मंत्रिपदाचा अनुभव नसल्याचे बोलले. तेव्हासुद्धा मी आश्वस्त होतो. मी म्हणायचो काही होणार नाही. ते ज्या शाळेत शिकले तिथले संस्कार इतके चांगले आहेत की त्या शाळेचा विद्यार्थी चुकीचे काम करणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणार नाही. पटले नाही, तर अलिप्तवाद स्वीकारतील. मला काही चिंता वाटत नाही, असेही पाटील यांनी अभिमानाने सांगितले.

शाळेच्या गीतमंचाने सत्कारमूर्तींचे स्वागत केले, तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्रथेनुसार शारदा स्तवन झाले. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री पाटील यांच्यासह सभागृहात उपस्थित सर्व जण हात जोडून होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शालेय गीतकारांच्या संपूर्ण चमूला व्यासपीठावर बोलावून त्यांचे कौतुक केले. त्यांच्यासोबत फोटोही काढले.

टॅग्स :उद्धव ठाकरेजयंत पाटीलआदित्य ठाकरे