Join us  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलं राम मंदिर ट्रस्टला पत्र; बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाची सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 3:59 PM

राम मंदिर निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षात शिवसेनेचं योगदान मोठं आहे

ठळक मुद्देअयोध्येतील विवादीत ढाचा पाडला गेला तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत होतेप्रत्येक जण आपल्या जबाबदारीपासून पळ काढत होता.राम मंदिरासाठी १ कोटींचा निधी ट्रस्टच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठवला

मुंबई – अयोध्येत राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. प्रभू राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटींचा निधी देण्यात आला आहे. हा देणगी देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टला पत्र पाठवलं आहे. ज्यात मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका आणि १ कोटींचा निधी कोणत्या माध्यमातून पाठवला याचा खुलासा करण्यात आला आहे.

राम मंदिर निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षात शिवसेनेचं योगदान मोठं आहे. ज्यावेळी अयोध्येतील विवादीत ढाचा पाडला गेला तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत होते, प्रत्येक जण आपल्या जबाबदारीपासून पळ काढत होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते ज्यांनी हे काम जर शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा गर्व आहे असं म्हटलं होतं. ही घटना तेव्हा खूप चर्चेत होती, आता ज्यावेळी मंदिर निर्माण होत आहे, तेव्हा शिवसेनेने मंदिर निर्माणाबद्दल आपली भावना व्यक्त करत आहे. मंदिर ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे योगदान यांनी आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर हजारो शिवसैनिकांनी राम मंदिराच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी जाण्याची सगळ्यांची इच्छा आहे तशी माझीही इच्छा होती असं मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते.

तसेच अयोध्या दौऱ्यानिमित्त राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. हा निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर २७ जुलै २०२० रोजी आरटीजीएसने पाठवण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रात दिली आहे.

अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त जवळ येत असताना उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात मंदिरासाठी शिवसेनेकडून एक कोटीच्या निधीची घोषणा केली होती. याबाबत काही माध्यमांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांना विचारले असता, शिवसेनेने राम मंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टला पैसे मिळाले की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. शिवसेनेने मात्र हा दावा फेटाळून लावला आणि अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

टॅग्स :राम मंदिरउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेशिवसेना