Join us  

"आदित्यला 'बडवे' म्हणायचं आणि स्वतःचा मुलगा खासदार; ही वीट डोक्यात हाणणार!"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 3:10 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- माझ्या कुटुंबीयांवर आणि मातोश्रीवर ज्यांनी घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. शिवसेनेची मूळं आजही माझ्यासोबत आहेत, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन संवाद साधला. 

काही लोक सांगतायत की, माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का?, असा , सवाल उपस्थित करत या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. 

Uddhav Thackeray: 'हिंमत माझ्या रक्तात आहे हे मी मोदींनाही सांगितलंय'; मुख्यमंत्री ठाकरेंचं शिवसैनिकांना संबोधन!

मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं हिंमत माझ्या रक्तात आहे. पहिलं ऑपरेशन ठिक होतं. पण ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या शरीराच्या काही भागांच्या हालचाली बंद पडल्या आहेत असं जाणवू लागलं. त्यामुळे दुसरं ऑपरेशन करावं लागलं. याकाळातही विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपाकडे; ऑपरेशन लोटस तर नाही?, या ३ गोष्टींमुळे वाढतोय संशय

दरम्यान, मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. महत्वाकांक्षा असावी पण अशी नसावी की ज्यानं दिलं त्यालाच खावं. तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा...आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता असलेले आमदार-

१) आदित्य ठाकरे २) अजय चौधरी ३) रमेश कोरगावकर ४) उदय सामंत ५) वैभव नाईक ६) रवींद्र वायकर ७) उदयसिंह राजपूत ८) संतोष बांगर ९) भास्कर जाधव १०) सुनील राऊत ११) राजन साळवी १२) नितीन देशमुख १३) कैलास पाटील १४) राहुल पाटील १५) सुनील प्रभू १६) प्रकाश फातर्पेकर १७) संजय पोतनीस.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे